उरणमध्ये विजेचा लपंडाव; वीज ग्राहकांसह मूर्तीकार त्रस्त

। उरण । वार्ताहर ।

उरणमध्ये वीज वाहिनीमध्ये सातत्याने बिघाड होत आहे. यामुळे शहरासह अनेक गावांमध्ये गेले अनेक दिवस विजेचा लंपडाव सुरू आहे. दिवसातून सहा ते सात तास वीज गायब होत असल्याने वीज ग्राहकांसह गणेश मूर्तीकार त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून संभाव्य नैसर्गिक आपत्तीची पूर्वतयारी केली जाते. पावसाळ्यात वादळी वारे किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी महावितरण सज्ज असल्याचे सांगितले जाते. परंतु, गेले अनेक दिवस उरण शहर व तालुक्यात अनेक भागांमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. फिडवरील अनेक गावे दिवसा तसेच रात्रीची काळोखात राहात आहेत. अनेकदा दुरूस्तीच्या नावाखाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित होण्याचे सातत्याने प्रकार सुरू आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याने वीज ग्राहकांना सध्या मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील फिडरवर अनेक गावे येत असताना या फिडरवरील वीज समस्या दूर झालेली नाही. मागील अनेक दिवस फिडरवरून होणारा विद्युतपुरवठा अनेकदा सकाळी, दुपारी तसेच संध्याकाळी या तीन सत्रात सातत्याने खंडित होत असतो. सध्या गणेशमूर्ती शाळांमध्ये युद्धपातळीवर गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे. अशावेळी दिवस-रात्र विद्युतपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराने गणेश मूर्तिकार हेदेखील हैराण झाले आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधल्यावर त्यांच्याकडून पाहतो, बघतो, काम चालू आहे, अशी नेहमीचीच साचेबद्ध उत्तरे दिली जातात.

आंदोलनाचा इशारा
गणेश चतुर्थीला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी मूर्ती सुकविणे, त्यावर रंगकाम करणे पूर्ण होणार का, असा प्रश्‍न मूर्तीकारांना सतावत आहे. त्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती उपकरणे जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात गणेशोत्सवाची तयारी करण्यात अडचण येत आहे. तरी गणेशोत्सवापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा जनतेकडून दिला जात आहे.

Exit mobile version