। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वीज महाग असल्याचा दावा केला आहे. त्यांनी अन्य राज्यातील वीज दरांची आकडेवारी मांडली आहे. मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी, असा उपरोधिक टोलाही सोशल माीडियावरील पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी महायुती सरकारला लगावला आहे.
जयंत पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, वीज बिलात 30% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या 4-5 महिन्यांपासून म्हणत आहेत. 30% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे. राजस्थानमध्ये प्रति युनिटला 7.55 – 8.95 रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये 3.34 ते 6.80 रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट 5.90 रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट 5.16 ते 17.79 रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत. वीज बिलात 30% कपात करणार, पाच वर्षे शेतकर्यांना मोफत वीज देणार, असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी! असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारने गांभीर्याने विचार करणे आवश्यक
गेल्या काही वर्षांत वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे वास्तविक उत्पन्न कमी झाले आहे. पुरेसे रोजगार उपलब्ध नाहीत. उद्योग आणि उत्पन्नाच्या संधी नाहीत. परिणामी सर्वसामान्य जनतेला आपल्या दैनंदिन गरजा भागविणेही अडचणीचे झाले आहे. सध्या लागू असलेल्या इंडस्ट्रीयल वीज दरामुळे राज्यातील अनेक छोटे औद्योगिक घटक अडचणीत आलेले आहेत. अनेक उद्योगांमध्ये वीज हा महत्वाचा कच्चा माल असतो. त्याचबरोबर राज्यामधील अनेक उद्योग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये टिकू शकत नाहीत. महावितरण आणि राज्य सरकार यांनी गांभीर्याने विचार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेने अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले होते.