| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ येथे माथेरानकडे जाणाऱ्या टॅक्सी स्टँड समोर असलेले 100वर्षे जुने झाड रात्री कोसळले होते. झाडासोबत या भागातील वीज पुरवठा करणाऱ्या तीन मुख्य वीज वाहिनी वाहून नेणारे खांब देखील कोसळले होते. मात्र, महावितरण आणि नेरळ ग्रामपंचायत यांनी ते झाड बाजूला काढून येथील वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न केले.
नेरळ रेल्वे स्टेशनजवळ टॅक्सी वाहतूक कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोर 100वर्षे जुने झाड आहे. 25 जुलै रोजी सोसाट्याच्या वारा आणि मुसळधार पाऊस यात ते झाड कोसळले. मात्र, झाडासोबत या भागातील विजेच्या तीन खांबांचे नुकसान झाले आहे. झाड कोसळल्याने झालेल्या नुकसानी बरोबर रस्त्याने होणारी वाहतूक बंद झाली आणि तेथील विज पुरवठा देखील खंडित झाला. याबाबत स्थानिकांनी आणि टॅक्सी संघटनेने नेरळ महावितरण कार्यालयाला कळविले. तसेच, नेरळ ग्रामपंचायत यांना कळविण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाने रस्त्यावर कोसळलेले मोठे झाड बाजूला करण्याचे आणि नंतर संपूर्ण झाडाचे तुकडे करून ते झाड बाजूला करण्याचे प्रयत्न केले. तर, नेरळच्या महावितरण कार्यालयाने देखील तत्काळ कार्यवाही सुरू केली असून या भागातील विजेचे खांब बदलण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अद्यापही या भागातील वीज खंडित आहे.