। सुकेळी । प्रतिनिधी ।
पावसामुळे नागोठणे शहरासह ग्रामीण भागातील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. मात्र वीज गेल्यानंतर ती कधी येईल? याची ही शाश्वती नसल्यामुळे विभागातील नागरिकांना अंधारातच तसेच डासांच्या त्रासामुळे संपूर्ण रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे नागोठणे विभागातील नागरीक महावितरणच्या त्रासाला अक्षरशः कंटाळले आहेत.
अजूनही पाऊस पडण्यासाठी जोर पकडला नसुन याच दरम्यान महावितरणाने विजेचा खेळखंडोबा मांडला आहे. नागोठणे परिसरातील ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये दोष आहे तर कधी या ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबतीत अनेक नागरिक वीज गेल्यानंतर तक्रार देतात. पंरतु त्याची महावितरण कर्मचारी तातडीने दखल घेत नाही. तर वरिष्ठ अधिकार्यांचे फोन लागत नाही. त्यामुळे वीज गेल्यानंतर ती केव्हा येईल याची खात्री नसल्यामुळे सद्यपरिस्थितीत विभागातील नागरीकांना रात्र ही अंधारातच तसेच मच्छरच्या त्रासामध्ये काढावी लागत आहे.







