करंजाडे वसाहतीत विजेचा खेळखंडोबा

नागरिकांची महावितरण कार्यालयावर धडक
वारंवार वीजपुरवठा होतो खंडित

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
ऐन उन्हाळ्यात वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे करंजाडे वसाहतीमधील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यातच सध्या सुरु असलेल्या परीक्षा काळात विद्यार्थ्यांनादेखील याचा फटका बसत असून, ऑनलाईन परीक्षेला मुकावे लागले असल्याने पालकांनी व वसाहतीतील नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणकडून सुरु असलेल्या या कारभाराचा निषेध म्हणून वसाहतीमधील नागरिकांनी रविवारी (ता.9) अखेर महावितरण कार्यालयावर रात्री धडक दिली आणि महावितरण विभागाच्या कारभाराचा निषेध केला.

करंजाडे वसाहतीत नागरीकरण वाढले आहे. या वाढत्या नागरीकरणाबरोबरच रहिवासी मोठ्या संख्येने या वसाहतीत राहण्यासाठी आलेले आहेत. महावितरण कार्यालयाकडून या वसाहतीला वीजपुरवठा केलेला आहे. मात्र, वीजपुरवठ्यावर भार येत आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थी घरून ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. मात्र, करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर 3, 4 तसेच इतर सेक्टरमध्येही रात्रीच्यावेळी गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वारंवार वीज खंडित झाल्याने काहींच्या घरातील उपकरणे बंद पडली आहे. हे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे उपकरणे बंद पडली असल्याने त्या उपकरणांची नुकसान भरपाई महावितरण कार्यालयाचे अधिकारी देणार का, असा सवाल रहिवाशांनी केला आहे. करंजाडे वसाहतीतील महावितरणच्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. लवकरात लवकर उपाययोजना करावे, अशी मागणी स्थानिकांनी करीत रविवारी रात्री करंजाडे कार्यालयावर धडक दिली.

करंजाडे वसाहतीत गेला काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांनी या वसाहतीला वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा करंजाडेवासियांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल.

– रामेश्‍वर आंग्रे, माजी सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत

गेल्या तीन ते चार दिवसांपासून सेक्टर 3, 4 तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आम्हाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अधिकार्‍यांनी उपाययोजना कराव्यात.

– संदीप पाचपुते, नागरिक
Exit mobile version