स्थानिकांच्या संतापाचा कडेलोट
। नेरळ । प्रतिनिधी ।
तालुक्यातील आदिवासी भागाची बाजारहाट करण्याचे ठिकाण असलेल्या कशेळे येथील व्यापार्यांनी वीज समस्येच्या विरोधात बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, कशेळे व्यापारी सामाजिक विकास संस्था यांच्या माध्यमातून महावितरण विभागाला निवेदन देत इशारा दिला आहे.
कशेळे या आदिवासी भागाचे केंद्रबिंदू असलेल्या विभागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सततचे खंडित वीज पुरवठ्यामुळे व्यापारी आणि स्थानिक रहिवाशी यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणकडून मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणाने वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होत असून कशेळे, कडाव येथील व्यापारी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा नियमित व्हावा तसेच वीजपुरवठा खंडित करण्याची कारणे स्पष्ट करावी, अशी मागणी सातत्याने करीत आहे. महावितरणकडून कारभार सुधारला जात नसल्याने अखेर स्थानिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. यामुळे कशेळे व्यापारी विकास सामाजिक संस्था यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत इशारा देण्यासाठी सर्व व्यापारी उपकेंद्र येथील शाखा अभियंता कार्यालयात पोहचले होते. तेथे चर्चा करीत असताना कशेळेसाठी स्वतंत्र फिडर द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, वंजारवाडी येथे फिडर आहे.कशेळेसाठी स्वंतत्र फिडरचे अंदाजपत्रक तयार आहे. कशेळे येथे वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी येथील लोड वाकस फिडरला जोडण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन कनिष्ठ अभियंता वैभव सिंग यांनी दिले आहे.







