| कर्जत | वार्ताहर |
नेरळमधील सतत खंडित होणार्या वीज पुरवठ्यामुळे नेरळकर संतप्त झाले आहेत. त्या प्रकाराला वैतागून नेरळकरांनी महावितरण कार्यालयात अधिकार्यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर महावितरणचे अधिकारी सुरेश हिंगणकर यांनी गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त करत उपाययोजना करू, असे सांगितले. पर्यटनाच्या दृष्टीने वाढत चाललेला कर्जत तालुका काही वर्षांपासून विविध समस्याने ग्रासला आहे. त्यातच मान्सून सुरू होण्यापूर्वीच महावितरणकडून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. नेरळ शहर झपाट्याने वाढले आहे. मात्र विजेच्या लपंडावामुळे लोक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे चिडलेल्या ग्राहकांनी थेट महावितरणच्या अधिकार्यांना घेराव घातला.
नेरळ शहर व परिसरात रात्री-बेरात्री केव्हाही कुठलीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जातो. यावरून नेरळमधील ग्राहकांनी अधिकारी आणि कर्मचार्यांना धारेवर धरले. अधिकारी, कर्मचारी फोन उचलत नाही म्हणून व्यापारी संघटनेचे सचिव विशाल साळुंके यांनी प्रश्न उपस्थित करत शहरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी. तर शिवसेना तालुका सचिव अंकुश दाभेणे यांनी वाढते शहरीकरण लक्षात घेऊन जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली. या संदर्भात वरिष्ठपातळीवर पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. तर बाजारपेठेत ट्रान्सफॉर्मर बसवावा, याकडे व्यापारी संघटनेचे अरविंद कटारिया यांनी लक्ष वेधले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर अहिरे यांनी प्रत्येक वार्डमधील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले. तसेच शहरात वाढलेली झाडे पावसाळ्यात तुटून वीजपुरवठा खंडित होतो, असे पंढरी हजारे यांनी सांगितले. त्यामुळे मान्सून काळात झाडे तुटून विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. जुन्या बाजारपेठेत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी कधीपासून सांगितले जात आहे. मात्र, काहीही झालेले नाही, हे भाजप तालुका उपाध्यक्ष अनिल जैन यांनी दाखवून दिले. सतत बाजारपेठेतील वीजपुरवठा खंडित होतो. अचानक वीजपुरवठा बंद होण्यामुळे विजेवर चालणार्या उपकरणांचे नुकसान होते. याची नुकसानभरपाई कोण करणार, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.