हत्ती गवताची लागवड यशस्वी

कंपनी टनाला एक हजार भाव देणार; वर्षभरात 1 लाख 20 हजार उत्पन्न

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरूड स्वप्नपूर्ती प्रोड्युसर कंपनी तर्फे हत्ती गवताच्या लागवडीचा डेमो प्रकल्प मुरूड तालुक्यातील वाणदे या गावी यशस्वी करण्यात आला आहे. वाणदे गावचे शेतकरी तुकाराम दामोदर पाटील आणि अमोल पाटील यांच्या 25 ते 30 एकर जमिनीत प्रायोगिक तत्त्वावर हत्ती गवताची लागवड करण्यात आली होती. कंपनीतर्फे गवताच्या पहिल्या कापणीचा शुभारंभ शनिवारपासून करण्यात आला.

स्वप्नपूर्ती प्रोड्युसर कंपनी 1000/- (एक हजार) टनाप्रमाणे हत्ती गवत खरेदी करणार आहे. एक एकर जमिनीत वर्षभरात सुमारे तीन वेळा 40 टन म्हणजे सुमारे 120 टन हत्ती गवत तयार होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यास या गवताचा मोठा उपयोग होतो. बायो सीएनजी, गाड्यांना लागणारे पेट्रोल, डिझेल, चांगल्या पद्धतीचा कोळसा, इंधन, बिअर, स्वयंपाक गॅस, सेंद्रिय खत, अशी विविध अत्यंत उपयुक्त उत्पादने कंपनीकडून निर्माण करून ठिकठिकाणी बाजारपेठेतून विक्रीस पाठविली जातात. तुकाराम पाटील यांनी गेल्या पावसाळ्यात या गवताची लागवड केली होती. आता लागवड यशस्वी ठरून मोठ्या प्रमाणावर गवत फोफावले आहे.

या गवताची लागवड मुरूड तालुक्यात यशस्वी होते की नाही याबाबत सुरुवातीला शंका होती; मात्र या गवताची लागवड कमालीची यशस्वी झाल्याचे दिसून आल्याचे तुकाराम पाटील यांनी सांगितले. आपल्याकडे स्वप्नपूर्ती कंपनी हे गवत विकत घेते. गवतासाठी कमी पाणी असणारी, पडीक, बांधावरील जमीनदेखील चालते. जगभरात अशा पर्यावरणपूरक उत्पादनांची आवश्यकता असल्याने स्वप्नपूर्ती कंपनी इको फ्रेंडली उत्पादने तयार करून रोजगारनिर्मितीस हातभार लावणार आहे. कंपनीचे मालक श्री. घोलप, प्राईम अधिकारी श्रावण माने, श्री. म्हात्रे, श्री. भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीत उत्पादने तयार करण्याचे काम सुरू आहे.

शेतकऱ्यांनी स्वप्नपूर्ती प्रोड्युसर कंपनीचे सदस्यत्व घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहन संचालक तुकाराम पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्वप्नपूर्ती प्रोड्युसर कंपनी जुन्या एसटी स्टँड बाजारपेठ, डिप्सन हॉटेलनजीक असणाऱ्या मुरूड जंजिरा, जिल्हा रायगड या कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा. या गवताला नॅपिअर ग्रासदेखील म्हटले जाते. परदेशात याचा खूप मोठा उपयोग केला जातो.

Exit mobile version