| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील नेरळ रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सेवेसाठी असलेले उद्वाहन (लिफ्ट) मागील चार दिवसांपासून बंद आहे. उद्वाहन बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. दरम्यान, माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ उद्वाहन सुरु करण्याची कार्यवाही व्हावी, अशी सूचना नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी केली आहे.
नेरळ हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन स्थानक आहे. या स्थानकातून माथेरान या पर्यटनस्थळी मिनीट्रेन जात असते. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक हे माथेरान येथे जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकात येत असतात. प्रवाशांचे मोठी गर्दी नेरळ रेल्वे स्थानकात असते आणि त्यासाठी नेरळ स्थानकात प्रवेशनाच्या सोयीसाठी उद्वाहन तसेच सरकता जिना बनविण्यात यावा, अशी मागणी नेरळ प्रवासी संघटना यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. सध्या नेरळ स्थानकात फलाट दोनवर असलेले उद्वाहन मागील चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे पावसाळी सुट्टीसाठी येणाऱ्या जिन्यावरून चढत जाताना आपल्या बॅगा सांभाळत जावे लागत आहे.
प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी यासाठी नेरळ रेल्वे स्थानकातील असलेले उद्वाहन तात्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांच्याकडून मध्य रेल्वे विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. नेरळ स्थानकात मंजूर असलेल्या अन्य एका उदवाहन यंत्रणेचे काम लवकरात लवकर सुरु करावे आणि मंजूर असलेले सरकता जिना या प्रकल्पाचे कामदेखील तात्काळ सुरु करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.