20 जुलै रोजी रस्ता रोको करणार
| नेरळ | वार्ताहर |
नेरळ-पेशवाई रस्त्यांची खड्यांमुळे अंत्यत दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी, वाहन चालक तसेच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या रूग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधी तसेच बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी करूनही ते याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नेरळमध्ये होत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी 20 जुलै रोजी नेरळ साईमंदिर चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषेत दिला आहे.
नेरळ-पेशवाई हा रस्ता कर्जत-कल्याण या मुख्य राज्यमार्गाला जाऊन मिळतो. परंतु, गेली अनेक वर्ष हा रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्याची कोणत्याही प्रकारची दुरूस्ती प्रशासनाकडून केली जात नाही. अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करूनही उपाययोजना होत नाही. या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. हे अपघात तसेच नेरळ शहरातील वाहतुक कोंडी रोखण्यासाठी हा रस्ता दुरूस्त होणे गरजेचे आहे. हा रस्ता झाल्यास नेरळ रेल्वे गेटमधील वाहतुक कोंडी कमी होईल, विद्यार्थी शाळेत वेळेत पोहचतील व रूग्णांना देखील मनस्ताप सहन करावा लागणार नाही. वेळोवेळी हे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील त्याच्यांकडून उपायोजना होत नाहीत. त्यांच्याकडून जाणून बुजून या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे. त्यामुळे नेरळमधील सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी 20 जुलै रोजी नेरळ साईमंदिर येथे रस्ता रोको करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
अनेक वर्ष लोकप्रतिधिनी आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणूनही तसेच लेखी पत्र व्यवहार करूनही झोपलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना जागे करण्याठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. जेणेकरून यानंतर हा रस्ता चांगल्या दर्जाचा होईल, अशी अपेक्षा आहे. या आंदोलनात सर्व सामन्य नागरिक, प्रवासी, वाहनचालक यांनी देखील या आंदोलनात सामील व्हावे.
गोरख शेप,
सामाजिक कार्यकर्ते, नेरळ







