कामोठेकरांचा मनपाविरोधात एल्गार

मालमत्ता कराबाबत मूक मोर्चाद्वारे निषेध
शेतकरी कामगार पक्षाचा मोर्चात सहभाग
पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगरपालिकेने पाच वर्षांचा मालमत्ता कर लागू केला आहे. त्याची रक्कम मोठी आहे. त्याचबरोबर सेवा दिला जात नसतानाही वेगवेळ्या विषयाखाली कर घेतला जात आहे. याला रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता कामोठेकरांनी बुधवारी मूक मोर्चा काढून चुकीच्या मालमत्ताकराला एक प्रकारे बोलका विरोध दर्शवला. फलक दाखवून मनपाच्या धोरणाला विरोध दर्शविण्यात आला. या मोर्चात शेतकरी कामगार पक्षासह अन्य पक्ष सहभागी झाले होते.

पनवेल महानगरपालिकेची 2016 साली स्थापना करण्यात आली. तेव्हापासून पाच वर्षांचा थकीत कर मनपा प्रशासनाने लागू केला आहे. वास्तविक पाहता, जेव्हा ठराव झाला तेव्हापासून कर लागू करणे आवश्यक आहे. मात्र, मनपाने स्थापनेपासून कर आदा करण्याबाबत रहिवाशांना सूचित केले आहे. त्याचबरोबर कचरा वगळता बाकी सर्व सुविधा सिडको देते. त्याबदल्यात सेवा शुल्क वसाहतीतील रहिवाशांनी भरलेले आहे. तरीही पाणी, मलनिःसारण, शिक्षण, अग्निशमन सेवेबाबत कराचा रचनेत समावेश करण्यात आलेला आहे. जी सेवा महानगरपालिकेने दिलीच नाही त्याचा कर आम्ही का दयायचा अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्था तसेच विरोधी पक्षानेही मालमत्ता कराला विरोध दर्शवला आहे. बुधवारी कामोठे वसाहतीत रहिवाशांनी एकत्रित येऊन मूक मोर्चा काढला.

मानसरोवर गृहसंकुलापासून हा मोर्चा सुरू झाला. त्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर चाकरमानी सहभागी झाले होते. कर नाही तर डर कशाला सेवा , सुविधा नाही तर कर कशाला, महापालिका कर घेणार सुविधा कोण देणार, प्रशासनाने जनतेचे ऐकले पाहिजे, मालमत्ता कर कमी केला पाहिजे, जुलमी मालमत्ता कर लावणार्या पनवेल महापालिकेचा निषेध, नाही भरणा नाही भरणार मालमत्ता कर नाही भरणार असे संदेश लिहिलेले फलक दाखवून मोर्चेकरांनी सर्वांचे लक्ष वेधले. कामोठे पोलीस ठाण्यासमोरील चौकात मोर्चाची सांगता झाली.
यावेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, शंकर म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, एकता सामाजिक संस्थेचे अमोल शितोळे, मंगेश अढाव, प्रशांत कुंभार सिटीझन युनिटी फोरमच्या रंजना सडोलीकर, दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम आंधळे,अस्मिता सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुलक्षणा जगदाळे, संगिता राऊत, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरदास गोवारी, शहराध्यक्ष चंद्रकात नवले, निलेश लंके प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख भाऊशेठ पावडे, दिलीप घुले, समर नवले, सचिन वाफारे यांच्यासह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कामोठे येथून मालमत्ता कराविरोधातील एल्गार
मालमत्ताकरा विरोधात कामोठेकरांनी खर्या अर्थाने एल्गार पुकारला. याचे लोण इतर वसाहतीत सुध्दा पसरेल आणि तेथेही विरोधात अशा प्रकारे रहिवाशांचा उद्रेक होईल. शेवटी महापालिका प्रशासनाने ही कररचना मागे घ्यावी लागेल.
आ. बाळाराम पाटील

हा अन्यायकारक कराविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज आहे. याला सत्ताधारी भाजपच जबाबदार आहे.
प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते

Exit mobile version