अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मागील वीस वर्षांपासून शासनासह प्रशासनाकडे खारघर शहर दारुमुक्त राहावे, या मागणीसाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, संबंधित यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संघर्षच्या माध्यमातून दारुमुक्ती शहरासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. सोमवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अविनाश पाटील, देवा पाटील, संजय जाधव, संघर्ष समितीचे पदाधिकारी, खारघरमधील नागरिक उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दारुमुक्त असणारे खारघर हे शहर दारुमुक्त राहावे, यासाठी संघर्षच्या माध्यमातून अनेक वेळा लढा देण्यात आला आहे. खारघर शहराला दारुमुक्त शहर घोषित करावे अशी मागणी अर्ज, पत्र, मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी तसेच वेगवेगळ्या विभागातील प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासठी संघर्ष समितीमार्फत जानेवारीपासून जनआंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनातील एक भाग म्हणून सोमवारी (दि.28) अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.






