भूमीपुत्रांचे आज जंतरमंतरवर आंदोलन
| खरोशी | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भूमीपुत्रांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. “दिबांची वारी… दिल्लीच्या द्वारी” या घोषणेसह बुधवार, दि. 5 ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या लाक्षणिक आंदोलनासाठी रायगडसह पाच जिल्ह्यांतील आगरी, कोळी, सागरपुत्र, शेतकरी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
दिबांच्या नावासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला निर्णायक वळण देण्यासाठी “दिबांची वारी… दिल्लीच्या द्वारी” या संकल्पनेतून 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य लाक्षणिक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र शासनापर्यंत भूमीपुत्रांचा एकमुखी आवाज पोहोचवून विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा अंतिम निर्णय तातडीने जाहीर करण्याची मागणी केली जाणार आहे.
हभप अमित महाराज पाटील, हभप चंदन महाराज, युवा नेते विजयभाऊ पाटील, तेजस पाटील तसेच पेण, पनवेल, उरण परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची माहिती देताना सांगितले की, ही केवळ नामकरणाची मागणी नसून भूमीपुत्रांच्या स्वाभिमानाची आणि न्यायाची लढाई आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला असला, तरी केंद्र शासनाची अंतिम मंजुरी अद्याप प्रलंबित आहे. यासाठी रायगडसह पाच जिल्ह्यांतील आगरी, कोळी, सागरपुत्र, शेतकरी, युवक, महिला आणि सर्व भूमीपुत्रांनी मोठ्या संख्येने जंतर-मंतर येथे उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा लढा कोणत्याही एका समाजाचा किंवा व्यक्तीचा नाही. हा भूमीपुत्रांच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि न्याय्य हक्काचा लढा आहे. पक्षीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येत केंद्र शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवूया, असे आवाहन आंदोलनाच्या आयोजकांनी केले आहे.
