आपत्तीनिवारणासाठी रात्रीचा काळोख मिटवा

38 ग्रामपंचायतींचे पथदिवे बंद; वीज बिल थकले
| पोलादपूर | प्रतिनिधी |

भुवैज्ञानिकांनी पोलादपूर तालुक्याला भुस्खलनप्रवण व दरडग्रस्त तालुका म्हणून निश्‍चित केल्यानंतर रात्रीच्या वेळी अतिवृष्टीदरम्यान या गावांतील रस्त्यावर पथदिव्यांचा प्रकाशझोत असण्याची गरज असूनही तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 38 ग्रामपंचायतींचे स्ट्रीट लाईट विद्युत बिले न भरल्याने बंद असल्याचा धक्कादायक अहवाल पंचायत समितीकडून प्राप्त झाला आहे. शासननिर्णयानुसार थेट विद्युत कंपनीला बिलांची रक्कम न देता जिल्हा परिषदेमार्फत बिल अदा करण्याची भुमिका स्पष्ट असूनही शासन बिल देणार असताना शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेल्या महावितरण कंपनीने विद्युतपुरवठा खंडीत करण्याचा प्रकार घडल्याने पोलादपूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यातदेखील अनेक ग्रामपंचायतींचा रात्रीचा पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडीत ठेवण्यात आला आहे.

महावितरण कंपनीला द्यायची रक्कम जिल्हा परिषदेमार्फत देण्याची शासननिर्णयामध्ये तरतूद केली असताना सदरच्या देयकांबाबत जिल्हा परिषदेने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांकडे अहवाल मागवून देयकाची रक्कम भरण्यासाठी 10 टक्के लेखाशिर्ष अनुदान देण्याची व्यवस्था 29 जून 2022च्या शासननिर्णयातून नमूद करण्यात आली आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या नियोजनामध्ये प्रशासन काळात दूर्लक्ष झाल्याने सदरची रक्कम महावितरणला अदा करण्याबाबत दूर्लक्ष झाले असल्याचे उघड झाले आहे. दुसरीकडे, काहीही झाले तरी शासनाने केलेली तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत अदा होणार असल्याचे माहिती असूनही महावितरण कंपनीने पथदिव्यांचा विद्युतपुरवठा बिले न मिळाल्यामुळे खंडीत केल्याचे उघडकीस आले आहे.

बंद पथदिव्यामुळे दुर्घटना
पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांच्या संख्येत गेल्यावर्षीपेक्षा यंदा अधिक वाढ झाली असताना रात्रीच्यावेळीच बहुसंख्येने उदभवणार्‍या आपत्तीनिवारणकामी पथदिव्यांचा प्रकाशझोत रस्त्यावर पडल्यास आपत्तीनिवारण आणि मदत कार्यासाठी सरसावणार्‍यांना तसेच स्वत: बचावाचा प्रयत्न करणार्‍या आपदग्रस्तांना दिलासा मिळू शकणार असताना गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना रस्त्यावरून चालताना पुराच्या पाण्याचा तसेच दरडी रस्त्यावर आल्याचा अंदाज येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलादपूर पंचायत समितीच्या अहवालानुसार कुडपण, मोरसडे, पैठण आणि बोरघर या केवळ चार ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिवे सुरू असून उर्वरित 38 ग्रामपंचायतींमध्ये काळोखाच्या साम्राज्यात अंधारवाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या 38 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील 52 महसुली गावे संभाव्य दरडग्रस्त असून सात गांवे पुरग्रस्तही आहेत. यापैकी केवळ सवाद या ग्रामपंचायतीमध्ये रात्रीच्यावेळी पथदिवे सुरू ठेवण्याकामी महावितरण कंपनीवर राजकीय वजनाचा उपयोग झाल्याची चर्चा असताना हे राजकीय वजन तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींसाठी का खर्च झाले नाही, असा सवालदेखील जनतेतून विचारला जात आहे.

Exit mobile version