बेरोजगारांना प्रशिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये अपहार; आ. जयंत पाटील यांचा आरोप

| नागपूर | दिलीप जाधव |

केंद्र शासनाच्या दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत राज्यातील बेरोजगार तरुण – तरुणीनां प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी नियुक्त केलेल्या छत्तीसगड़मधील सूर्या वायर्स, ध्येयपूर्ती, जाईजुई आणि एस्टर अपरेल एन्ड लेदर या 4 कंपन्यांनी 7 कोटी 26 लाखांचा अपहार केल्याचा आरोप शेकाप आ.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केला. तसेच अपहार झालेला निधी वसूल करण्यासाठी संबंधित संस्थांच्या मालमत्तेवर टाच सरकार आणणार आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.

आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्‍नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, संबंधित कंपनीचे संचालक अग्रवाल आणि सुनील जैन यांच्या कंपनीने राज्यातील 2500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असल्याचे मान्य केले. परंतू त्यांनी शासनाने दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन केले असून 7 कोटी 26 लाख रुपयांचा अपहार केल्यामुळे नवी मुंबईतील सीबीड़ी बेलापुर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच या कंपन्याविरुद्ध त्यांच्या मालमत्तेवर महसूल खात्यामार्फत आर्थिक बोजा चढ़विता येईल का? हे तपासले जाईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत केली.

तथापि सूर्या वायर्स या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने लवाद नेमणूक केला आहे. सदर लवादाबाबत राज्य व्यवस्थापन कक्षाकडून हरकर घेण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंंगाने सदर संस्थांना देण्यात आलेला निधी परत मिळविण्यात पोलिसांमार्फत कार्यवाही सुरु आहे. सूर्या वायर्स कंपनीने 588 लाभार्थीना प्रशिक्षण व 40 प्रशिक्षित लाभार्थीना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे महाजन यांनी सांगितले.

Exit mobile version