बनावट खाती उघडून कोट्यवधींचा अपहार

| बंगळुरू | प्रतिनिधी |

बनावट कागदपत्रे सादर करून लोकांच्या नावावर बेकायदेशीरपणे बँक खाती उघडून अपहार करणाऱ्या आई आणि मुलासह 12 जणांच्या टोळीला बंगळुरूमधील हुलीमावू ठाण्याच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 14) अटक केली. त्यांच्याकडून 4.89 लाख रुपये रोख आणि 1 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकांसह व्यावसायिक संस्थांची सुमारे 240 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दोन व्यक्ती इतरांच्या नावावर बँक खाती उघडत होते. तर स्वतःच्या नावाने सीमकार्ड खरेदी करत होते. दुबईतील दुसऱ्या व्यक्तीच्या फायद्यासाठी आणि जुगार व्यवसायात मदत करण्यासाठी बँक खाते आणि सीमकार्डचा वापर केला जात होता.

याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी विविध मार्गाने माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे त्यांनी जे.पी. नगरच्या नवव्या फेजमधील अंजनपूर येथील एका अपार्टमेंटजवळ आई आणि मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 206 डेबिट कार्ड, 23 मोबाईल फोन, 531 ग्रॅम सोन्याचे दागिने, 4.89 लाख रुपये रोख, 9 घड्याळे, 36 सीमकार्ड, 23 चेकबुक, 21 पासबुक, 1 लॅपटॉप, 1 ऑनलाईन डिजिटल पेमेंट रिंग, 1 क्रिप्टो करन्सी बुक व गुन्ह्यात वापरलेली कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांनी दोघांचीही सखोल चौकशी केली असता अधिक पैसे कमविण्याच्या उद्देशाने त्यांनी बँक खाती उघडून कमिशन देण्याचे आश्वासन दिले. या कृत्यात आणखी दहाजणांचा सहभाग होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील राजेंद्रनगरमधील एका घरात राहणाऱ्या दहाजणांना अटक केली. त्यांनी घराचे कार्यालयात रुपांतर केले होते. हे संशयित राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि इतर राज्यातील आहेत. त्यांच्याकडून 36 डेबिट कार्ड, 35 मोबाईल फोन, दहा चेकबुक, 6 लॅपटॉप आणि 12 सीमकार्ड जप्त करण्यात आले असून सर्वांना शहरात आणण्यात आले आहे. 240 कोटी रुपयांची फसवणूकया प्रकरणातील मुख्य संशयित दुबईमध्ये असून त्याचा शोध सुरू आहे. संशयितांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 240 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे, असे पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंह यांनी सांगितले.

Exit mobile version