| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सज्जता वाढविण्यासाठी गुरुवारी (दि.9) आपत्कालीन रंगीत तालीम (मॉक एक्सरसाइज) यशस्वीरित्या पार पडली. ही तालीम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तसेच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या रंगीत तालमीदरम्यान विविध आपत्तीजन्य परिस्थितींचे प्रतिकात्मक सादरीकरण करण्यात आले. विशेषतः विमान अपघात, आग लागणे, तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती अशा प्रसंगांवर तात्काळ आणि समन्वयाने कशी कार्यवाही केली जाते, याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. यात पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आपत्कालीन सेवा यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या सरावामुळे आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून भविष्यातील संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी यंत्रणा अधिक सज्ज राहणार आहे.






