| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या थंड हवेचे ठिकाणी असलेली स्वच्छता पर्यटकांना कायम आकर्षित करीत आली आहे. त्यामुळे माथेरान गिरीस्थान नगरपरिषदकडून सेवा पंधरवडामध्ये स्वच्छता राखण्यावर भर देण्यात आला आहे.
माथेरान हे शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचे वैशिष्ट्ये जपण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक आणि माथेरान नगरपरिषद तसेच शासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून केला जात असतो. स्वच्छ शहर आणि स्वच्छ पर्यटनस्थळ म्हणून मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानमध्ये येत असतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सेवा पंधरवडा साजरा होत आहे. त्याच माध्यमातून माथेरान नगरपरिषदकडून स्वच्छता कॅम्प आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे. स्वच्छता कॅम्पमध्ये स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि माथेरान नगरपरिषदमधील अधिकारी वर्गाकडून दररोज वेगवगेळ्या भागात जाऊन तेथील संपूर्ण स्वच्छता राखण्याचे काम केले जाते. स्वच्छता सेवा कॅम्पच्या निमित्ताने शहरात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून हा सेवा पंधरवडा साजरा होत आहे.
स्थानिक नागरिक आणि पर्यटनासाठी आलेले पर्यटक यांना आवाहन करण्यात येत असून स्वच्छता रॅली आयोजित करून स्वच्छतेचे महत्व विषद करणारी जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या माथेरान नगरपरिषदकडून सेवा पंधरवडामध्ये कचरा संकलन करण्यावर भर देण्यात येत असून सर्व कचरा तत्काळ त्याचदिवशी कचरा डेपो येथे पोहचवण्यावर भर दिला जात आहे. मुख्याधिकारी आणि प्रशासक राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान शहरात स्वच्छता सेवा कॅम्प आणि सेवा पंधरवडा साजरा होत आहे.
सेवा पंधरवड्यात स्वच्छतेवर भर
