स्थानिकांच्या रोजगारात भर; व्यावसायिकांमध्ये समाधान

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरान अंतर्गत वाहतुकीची गहन समस्या ई-रिक्षाच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असून स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने ई-रिक्षा ही स्थानिकांसह पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. माथेरानला ई-रिक्षा सुरू झाल्याची चर्चा सर्वदूर पसरल्याने पावसाळ्यात सुध्दा पर्यटकांची तोबा गर्दी पहायला मिळत असून सर्वांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

कधी नव्हे ती प्रचंड गर्दी यंदाच्या पावसाळ्यात तसेच शनिवारी आणि रविवारी सुद्धा ई- रिक्षेसाठी पर्यटकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी वर्गाला ने-आण करण्यासाठी अत्यंत माफक दरात ही सेवा उपलब्ध होत असल्याने मागील काळात ज्यांनी या सेवेला ताकदीनिशी विरोध दर्शविला होता त्यांनी सुद्धा या ई-रिक्षांचा स्वीकार करून आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी ई-रिक्षाचे पास काढून दिले आहेत. अनेकदा रुग्णांसाठी नगरपरिषदेची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी या सेवेचा अधिक लाभ सर्वांनाच होत आहे.माथेरानमधील नेहमीच भेडसावत असणारी अंतर्गत वाहतुकीची समस्या ई-रिक्षाच्या माध्यमातून मार्गी लागल्याने पर्यटक मिनीट्रेनच्या शटल मधून आनंद घेत आहेत तर हौशी पर्यटक घोड्यावर रपेट मारताना दिसत आहेत. तसेच अपंग, जेष्ठ नागरिक, पर्यटक, शालेय विद्यार्थी या ई-रिक्षाच्या सेवेचा लाभ घेत आहेत.

येथील तीनही शाळेतील विद्यार्थ्यांची पायपीट ई-रिक्षामुळे क्षमली आहे. आम्ही शालेय विद्यार्थ्यांना प्रथमतः प्राधान्य दिले असून त्यांना शाळेत वेळेवर जाता येत असल्याने अभ्यासक्रमात मुलांची प्रगती होताना दिसून येत आहे.

शैलेश भोसले,
ई-रिक्षा चालक,
माथेरान

शनिवार सुट्टी असल्याने आम्ही सहकुटुंब येथे फिरावयास आलो. आमचे आईवडील वृद्ध असल्यामुळे त्यांना माथेरान स्टेशन भागापर्यंत आरामात यायला मिळाले. माथेरानमध्ये ई-रिक्षा हा वाहतुकीसाठी चांगला उपक्रम राबविला जात आहे.

महिपत जोगी,
पर्यटक,
मुंबई
Exit mobile version