सूर्याचे मेलबर्नवरही साम्राज्य!

झिम्बाबेवर 72 धावांनी मात करुन 8 गुणांसह गट क्रमांक दोनमध्ये भारताने अव्वल स्थान मिळविले आणि ऑडिलेड येथील इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या दुसर्‍या लढतीत खेळण्याचा मान मिळविला. 10 नोव्हेंबरला हा सामना होईल.

पुन्हा एकदा मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड सूर्यकुमारच्या तडफदार फलंदाजीने चमकले. मेलबोर्नला खेळांची राजधानी म्हणतात. या राजधानीत सूर्यकुमार एखाद्या राजासारखा वावरला. विराट तंबूत परतताना फटकेबाजीचा राजदंड सूर्याच्या हाती सोपवून गेला. फलंदाजीच्या प्रातांतल्या सम्राटाप्रमाणेच मग सूर्याने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर राज्य केले. त्याने मझराबनीचा चेंडू त्याच्या खास शैलीतील स्केटू ड्राईव्हने सीमापार पाठविला आणि मग मेलबर्नच्या मैदानावरील सूर्याच्या चौफेर फटक्यांच्या फटकाराने एका झंझावाती डावाचा कॅनव्हास रंगत गेली. मझराबनीच्या चेंडूला सरळ रस्ता दाखविणार्‍या सूर्यानी नर्गवाच्या गोलंदाजीवर मात्र बॅटचे पाने आडवे केले. त्याने स्लीपच्या डोक्यावरुन थर्डमॅनला चौकार मारला तर त्याच षटकात आखूड टप्प्याचा चेंडू हूक केला. चटाराच्या वेगाला दिशा देताना सूर्याने चक्क स्कूप स्वीप, रिव्हर्स स्कूप अशी फटक्यांनी आपला भाना समृद्ध असल्याचे दाखवून दिले. भारताच्या डावातील नर्गवाच्या अखेरच्या चेंडूवरचा सूर्याचा रिव्हर्स स्कूपचा फटका सीमारेषेपलिकडे पडला. त्या षटकाराने 187धावांचे आव्हान उभे केले.

भुवनेश्‍वर कुमारने पहिल्याच चेंडूवर झिम्बाबेेची विकेट घेतली आणि अर्षदीपने आपल्या पहिल्याच षटकात बळी मिळविला. 1 बाद शून्यवरुन झिम्बाबेची अवस्था 5 बाद 36 झाली. पण सिकंदर रशी व रामन बुरी यांनी 60 धावांची भागिदारी करुन झिम्बाबेची पत रोखली.

मेलबर्नचय खेळपट्टीच्या उसळीचा आणि कोरड्या खेळपट्टीचा भारताच्या फिरकी गोलंदाज आश्‍विनने आज अचूक लाभ उचलला. त्याने 4 षटकात 3 बळी घेतले आणि टी-20 क्रिकेट सामन्यांमधील बळींचे शतकपूर्ण केले. अक्षर पटेलचा अपवाद वगळता भारताच्या सर्वच गोलंदाजांनी आज बळी मिळविले. उपांत्य फेरीच्या लढतीसाठी भारतीयांच्या दृष्टीने ही समाधानाची गोष्ट आहे. अंतिमफेरी गाठल्यास याच मैदानावर लढत होईल. त्यावेळी भारतीय गोलंदाजांना याचा लाभ होईल.

25 चेंडूतील सूर्यकुमार यादवच्या 61 धावांच्या झंझावाती खेळीने विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अखरेचा साखळी लढतींमधील धक्कादायक निकालांची मालिका थांबविली. 4 षटकार व 6 चौकारांच्या सहाय्याने सूर्याने फटकाविला. नाबाद 61 धावांच्या खेळीमुळेच भारताला झिम्बाबेपुढे 187 धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवता आले. त्याआधी बांगलादेशविरुद्ध सामन्यापासून फॉर्म गवसलेल्या के.एल. राहूलने आजही अर्धशतक पूर्ण केले. 3 षटकार 3 चौकारांची त्याची खेळी, फेरीच्या सामन्यांसाठी तो फॉर्मात येत असल्याची ग्वाही देणारी होती. कर्णधार रोहित शर्माने 13 चेंडूत 15 धावा फटकाविल्या खर्‍या, पण भारताला हवा असलेला रोहित शर्मा अजूनही गेल्या पाच सामन्यात दिसलाच नाही. विराट कोहलीचा डाव रंगांत येतोच असे वाटत असतानाच संपला. विल्यम्सची फिरकी दिलेली चेंडू उंच टोलविण्याच्या प्रयत्नात त्याने झेल दिला. दिनेश कार्तिकच्या जागी, दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौरा गाजविणार्‍या ऋषभ पंतला संधी देण्यात आली. मात्र त्याला फलंदाजीत आधीचा फॉर्म दाखविता आला नाही. हार्दिक पंड्याने 18 चेंडूतील 18 धावांची खेळी करुन सूर्यकुमारला पाचव्या विकेटसाठीच्या 65 धावांच्या भागिदारीत मोलाची साथ दिली. भारताला संघ सुरुवातीनंतर 186 धावसंख्या गाठता आली.

Exit mobile version