परिचारिका, डॉक्टर यांचे मार्च-एप्रिल महिन्यांचे रखडले मानधन
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
कंत्राटी डॉक्टर व परिचारिका रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आले आहेत. मात्र कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांचे मानधन देण्यास जिल्हा रुग्ण प्रशासन उदासीन असल्याचे समोर आले आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे मानधन रखडले आहेत. त्याचा नाहक त्रास या कर्मचार्यांना होत आहे. या कर्मचार्यांना महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अपुर्या मनुष्यबळामुळे कार्यरत डॉक्टर व परिचारिकांना रुग्णालयात सेवा देताना मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहे. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात येणार्या चांगल्या सेवा मिळाव्या यासाठी कायम सेवेत असलेल्या डॉक्टरांसह परिचारीकांच्या मदतीसाठी कंत्राटी डॉक्टर व परिचारीकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 34 कंत्राटी परिचारीका व 3 तीन एमबीबीएस डॉक्टरांची नेमणणुक करण्यात आली आहे. 250 खाटांचे असलेल्या रुग्णालयात अनेक आजार असलेले रुग्ण येतात. या रुग्णांना चांगली सेवा मिळावी. त्यांच्यावर योग्य पध्दतीने उपचार व्हावे यासाठी कंत्राटी डॉक्टर व परिचारिका त्यांचे काम नियमीतपणे करीत आहेत. मात्र त्यांना त्यांचे मानधन वेळेवर मिळत नसल्याचे समोर आले आहे. कंत्राटी परिचारिकांच्या समस्यांकडे जिल्हा रुग्ण प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत परिचारिकांकडून मानधनाबाबत विचारणा केली जाते, परंतू निधी उपलब्ध न झाल्याने मानधन थांबले असल्याचे सांगितले जात आहे. कंत्राटी परिचारिका मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. मानधन नसल्याने घरभाडे, विद्युत बिल व अन्य घरगुती कामे करण्यास अडथळे येत आहेत.
कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांच्या मानधनाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून धुळ खात आहे. मात्र त्यावर ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चित्र आहे. या कर्मचार्यांचे मानधन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी वर्गात प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचे सुर उमटत आहेत.
जिल्हा रुग्णालयात 34 परिचारीका व तीन डॉक्टर कंत्राटी स्वरुपात काम करीत आहेत. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे मानधन रखडले आहे. शासनाकडून 30 लाख रुपयाच्या निधीची मागणी केली आहे. निधी अद्याप न आल्याने मानधन थांबले आहे.
राजेश केणी, कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालय
निधीचा अन्य कामासाठी वापर होत असल्याची चर्चा
जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्याच्या मानधनाची समस्या ही कामयच राहिली आहे. गेल्या नोव्हेंबरपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने त्याचा फटका या कर्मचार्यांना बसत आहे. आलेल्या निधीचा वापर अन्य ठिकाणी केल्याची चर्चादेखील जिल्हा रुग्णालयात होत आहे. त्यामुळे या मागचे गुपित काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.