कर्मचार्‍यांनो, संप मिटवा

एसटी कर्मचारी संप मिटणार की सुरुच राहणार याबाबत अद्यापपर्यंत ठोस असे काहीच जाहीर झालेले नाही.त्यामुळे गेले 18 दिवस आगारातच ठप्प असलेली लालपरी रस्त्यावर कधी येणार याचीच प्रतीक्षा आता सर्वसामान्यांना लागून राहिलेली आहे. विलिनीकरणाच्या मुद्यावर गेले 18 दिवस एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. त्यामुळे राज्याचा गावगाडाच ठप्प झाला आहे. कारण एसटी ही राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. साठ वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी एसटी महामंडळाची स्थापना केली होती. त्यापासून आजपावेतो एसटी अव्याहतपणे धावत आहे. त्याचबरोबरच राज्याच्या विकासाची चाकेही फिरत आहेत. पण गेल्या 18 दिवसांपासून विलिनीकरणाच्या मुद्यावरुन हा गावगाडा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. एसटीतील काम करणार्‍या सर्वच अधिकारी, कर्मचारी यांना पुरेसे वेतन, मोबदला मिळालाच पाहिजे अशी राज्यातील सर्वसामान्यांची प्रामाणिक इच्छा आहे. कारण अत्यंत अपुर्‍या वेतनावर हे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांचे हे काम जनसेवेसारखेच आहे. त्यामुळे त्यांच्या या मागण्या रास्तच आहेत. विद्यमान ठाकरे सरकारनेही आधी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ठ झाल्याने त्यावर कोणत्याही प्रकारचा तातडीने निर्णय घेणे अशक्य आहे. यासाठी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी एसटीच्या कर्मचार्‍यांना सरसकट 41 टक्के पगारवाढ जाहीर केलेली आहे. ही पगारवाढ मुळ वेतनाशी निगडीत असल्याने सर्वच कर्मचार्‍यांचे पगार तीन ते पाच हजारांनी निश्‍चित वाढणार आहेत. शिवाय हे सर्व पगार दरमहा 10 तारखेच्या आत देण्याचीही ग्वाही परिवहन मंत्र्यांनी दिलेली आहे. उत्पन्न वाढ करणार्‍या कर्मचार्‍यांना इन्सेन्टिव्ह बोनस देण्याचीही घोषणा परब यांनी केलेली आहे.पगारवाढ केल्याने सरकारी तिजोरीवर आता दरमहा 750 कोटींचा अतिरिक्त बोजाही पडणार आहे. पण सरकारने तो अतिरिक्त भार सहन करण्याची तयारी दर्शविली आहे. आता या मागणीचा एसटी कर्मचार्‍यांनी सहानुभूतीने विचार करुन सुरु असलेला संप मागे घ्यावा आणि लालपरीचे स्टेअरिंग पुन्हा ताब्यात घ्यावे. कारण एसटी सुरु होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी ही एसटी अशीच बिन धावता आगारातच बसून राहिली तर त्याचा मोठा त्रास सर्वसामान्यांनाच होणार आहे. एसटीची चाके धावली तर महामंडळात नोकरी करणार्‍यांच्या चुली पेटणार आहेत. विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळा, महाविद्यालयामध्ये जाऊ शकणार आहेत आणि जे आजारी आहेत त्यांना तातडीने उपचार करुन घेणे शक्य होणार आहेत. सध्या एसटीच बंद असल्याने हा सारा गावगाडा ठप्प झाला आहे. याचा मोठा परिमाण सर्वसामान्यांवर झालेला आहे. यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी सरकारने दिलेल्या पगारवाढीचा स्वीकार करुन पुन्हा एकदा नव्या जोमाने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन आम्ही यानिमित्ताने करीत आहोत. महामंडळाचे विलिनीकरण व्हावे, या मागणीला आमचाही प्रामाणिकपणे पहिल्यापासूनच पाठिंबा आहे. त्या मागणीचा सरकार दरबारी भविष्यात पाठपुरावा करणे इष्ट ठरेल. आता जे काय दिले आहे ते पदरात पाडून घेऊन जे मिळाले नाही त्यासाठी प्रयत्नशील राहणे यातच शहाणपण आहे. कारण कुठलेही आंदोलन कुठपर्यंत ताणून धरायचे, आणि कधी थांबवायचे हे आंदोलन करणार्‍यांना आणि त्यांचे नेतृत्व करणार्‍यांना ज्ञात असणे गरजेचे आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या आम. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनीही सरकारने दिलेल्या पगारवाढीचा प्रस्ताव मान्य करुन कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन केलेले आहे.शिवाय आझाद मैदानावर सुरु असलेले आंदोलनही संपल्याचे खोत, पडळकर यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांनीही आता फार ताणून न धरता संप मागे घ्यावा आणि तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन आम्ही यानिमित्ताने करीत आहोत. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला आमजनतेची नेहमीच सहानुभूती मिळालेली आहे. अद्यापही ती कायम आहे. त्यामुळे ही सहानुभूती गमावू नका, संप मागे आणि लालपरी पुन्हा एकदा राज्याच्या कानाकोपर्‍यात धावू दे एवढीच माफक अपेक्षा आम्ही या माध्यमातून करीत आहोत.जर एवढी विनंती करुनही एसटी कर्मचारी इरेलाच पेटले तर आतापर्यंत जनतेची मिळालेली सहानुभूती गमावून बसतील याचे स्मरण ठेवावे. सुज्ञास अधिक न सांगणे उचित.

Exit mobile version