कर्मचार्‍यांनो, संप मागे घ्या!

एसटी महामंडळाचे भावनिक आवाहन
। मुंबई । वृत्तसंस्था ।
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांना पत्राद्वारे संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळं आपली लालपरी आधीच आर्थिक संकटात आहे. संप करून तिला आणखी गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा 12 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. असं असूनही गेल्या 18 महिन्यांचं वेतन महामंडळानं दिलं आहे. त्यासाठी राज्य सरकारनं 3549 कोटींचा निधी दिला आहे. यापुढं सर्वांचं वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही महामंडळानं दिली आहे.
शासकीय कर्मचार्‍यांच्या धर्तीवर महागाई भत्ता (28 टक्के) व घरभाडे भत्त्याची (8,16,24 टक्के) आपली मागणी मान्य करण्यात आली आहे. दिवाळी भेटही देण्यात आली आहे. असं असताना विलिनीकरणाच्या अचानक पुढं आलेल्या मागणीसाठी संप सुरू आहे, त्या मागणीचाही विचार सुरू आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे, असं महामंडळानं म्हटलं आहे.
सध्याच्या संपामुळं महामंडळाला दररोज 15 ते 20 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. संपाचे विपरीत आर्थिक परिणाम आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. संपामुळं गेले कित्येक दिवस सर्वसामान्यांचे अतोनात हाल होत आहेत. या सार्‍याचा विचार करून आपण तातडीनं संप मागे घ्यावा व कामावर रुजू व्हावे, अशी विनंती महामंडळानं कामगारांना केली आहे.

Exit mobile version