काळी फीत लावून आंदोलन व निदर्शने
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
केंद्र शासनाच्या खासगीकरण, कंत्राटीकरणाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी तसेच इतर प्रलंबित मागण्यांकरिता दि. 28 व 29 मार्च रोजी देशातील विविध कर्मचारी, कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. या दोन दिवसीय संपाला जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचार्यांनी पाठिंबा दिला. यावेळी ठिकठिकाणी काळ्या फीत लावून आंदोलन व निदर्शने करण्यात आली.
रायगड जिल्ह्यात 28 मार्च रोजी सर्व राज्य सरकारी कर्मचारी यांनी काळ्या फीत लावून काम केले, तसेच 29 मार्च रोजी दुपारी भोजन सुट्टीत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग तसेच सर्व तालुक्यांत तहसीलदार कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या वतीने मा. प्रधानमंत्री यांना देण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या निदर्शने आंदोलनाच्या वेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, कोषाध्यक्षा दर्शना पाटील, सहचिटणीस रत्नाकर देसाई, प्रफुल्ल कानिटकर अलिबाग तालुका अध्यक्ष प्रणाली म्हात्रे, उपाध्यक्ष निला देसाई, संतोष पेरेकर, संतोष तावडे, रायगड जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राजेंद्र पाटील, सूर्यकांत पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
खासगीकरण, कंत्राटीकरणाच्या धोरणाला विरोध, कामगार कायद्यात बदल करुन कामगारांच्या हिताचा संकोच, महागाई व बेरोजगारीत लक्षणीय वाढ यांस विरोध तसेच सर्व सरकारी कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा, कंत्राटी कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, शासनाच्या सर्व विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती तात्काळ करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांकरिता हा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता.