मुठीत जीव घेऊन कर्मचारी करताहेत काम
| पेण | मुस्कान खान |
पेण तालुका उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाची इमारत धोकादायक झाली असल्याने कर्मचार्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. मात्र, संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, एखादा मोठा अपघात झाल्यास यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाच्या उदासीन धोरणामुळे आजही कित्येक सरकारी कार्यालये भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत. त्यातीलच हे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय आहे. या इमारतीच्या गॅलरीला पूर्णतः तडे गेले असून, ती केव्हाही पडण्याची शक्यता आहे. या कार्यालयात एक उप अभियंता, दोन शाखा अभियंता, दोन कार्यालयीन कारकून, एक शिपाई असे कर्मचारी असून, साईडवर काम करणारे कर्मचारीदेखील या कार्यालयात हजेरीसाठी ये-जा करत असतात. तसेच वेगवेगळ्या साईडवर काम करणार्या एजन्सीचे कर्मचारीदेखील या कार्यालयात येत असतात. त्यामुळे दुर्दैवाने काही घटना घडल्यास कर्मचारी मोठ्या संकटात येऊ शकतात. या इमारतीला महिन्याला पंधरा ते वीस हजार रूपये भाडे शासन देत आहे. मात्र, सुरक्षतेच्या दृष्टीने धोकादायक प्रथमदर्शी ही इमारत दिसत आहे. त्यामुळे कर्मचारी एक वेगळ्या दडपणाखाली काम करत असल्याचे समजले.