शेकापतर्फे उद्या रोजगार मेळावा: युवक, युवतींना आशेचा किरण

दहा हजार जणांचा सहभाग
चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार

| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगडातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना नोकरीची संधी मिळावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील युवक, युवतींसाठी तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. सोमवारी (10 एप्रिल) अलिबागमधील पीएनपी महाविद्यालयाच्या प्रांगणात या मेळाव्याचा प्रारंभ सकाळी दहा वाजता होणार आहे. त्याची तयारी शेकापतर्फे जोमाने सुरु असून असून ही तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये युवक, युवतींना बसण्यासाठी आसन व्यवस्था, अर्ज नोंदणीपासून मुलाखतीची चोखपणे व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यात दहा हजार युवक युवती सहभागी होण्याची शक्यता आहे.

सोशल मिडियातून प्रसार
गेल्या महिन्याभरापासून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या मेळाव्याबाबत जनजागृती सुरु आहे. गावागावातील युवक युवतींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून युवक युवतींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. मेळाव्यासाठी पत्रकेदेखील वाटप करून युवक व युवतींपर्यंत ही माहिती पोहचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात येणार्‍या पहिला रोजगार मेळावा सोमवार 10 एप्रिल रोजी वेश्‍वी येथील पीएनपी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. दुसरा मेळावा मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी मुरुड येथील व्ही. एन. महाविद्यालयाच्या प्रांगणात तर तिसरा मेळावा बुधवार दिनांक 12 एप्रिल रोजी रोहा येथील सानेगाव हायस्कूलच्या प्रांगणात घेतला जाणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी चार यावेळेत हा मेळावा भरविला जाणार आहे.

पन्नास कंपन्यांचा सहभाग
अलिबागमध्ये होणार्‍या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या मेळाव्यात सहभागी होणार्‍या युवक व युवतींची गैरसोय होऊ नये.यासाठी आसन व्यवस्थेची व्यवस्था केली आहे. एकूण वेगवेगळ्या 50 कंपन्यांचा या मेळाव्यात समावेश असणार आहे. या 50 कंपन्याचे 50 स्टॉल असणार आहे. सकाळपासून येणार्‍या उमेदवारांना अर्ज दिले जाणार आहे. त्या अर्जाची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर थेट त्या उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या पदांसाठी घेतली जाणार आहे. त्यामध्ये यशस्वी झाल्यावर तातडीने उमेदवाराला भरती केल्याचे पत्र दिले जाणार आहे. या मेळाव्यात सुमारे दहा हजार युवक युवती सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आठवीपासून उच्च व व्यवासायिक शिक्षण घेणार्‍या उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेकापच्यावतीने करण्यात येत आहे.

शेकापने नेहमीच युवाशक्तीला प्राधान्य दिले आहे. युवक, युवतींना चांगल्या नोकर्‍यांची संधी मिळावी या हेतूने आम्ही जिल्हास्तरातर तीन रोजगार मेळावे घेत आहोत.त्याचा प्रारंभ आज होत आहे.याचा फायदा जिल्ह्यातील युवाशक्तीला निश्‍चित होईल.

– चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख
Exit mobile version