रिकाम्या ऑक्सिजन सिलेंडरमुळे रुग्णाची फरपट

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी (ता.13) रात्री ऑक्सिजन कमी झालेल्या तरुण रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी असलेले ऑक्सिजनचे सिलेंडर रिकामे असल्याने या रुग्णाची फरपट झाली. अखेर खाजगी दवाखान्यातून ऑक्सिजन सिलेंडर आणून या रुग्णाला रुग्णवाहिकेतून कळंबोली येथे रुग्णालयात नेण्यात आले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की गौरव ओसवाल हा तरुण पाली पोलीस स्टेशनमध्ये कारागृहात होता. यावेळी त्याला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या ऑक्सिजनची पातळी खाली गेली. त्यामुळे पोलिसांनी त्याला पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले 6 ऑक्सिजनचे सिलेंडर चक्क रिकामे होते. अशावेळी ऑक्सिजनअभावी या रुग्णास त्रास होत होता. त्यानंतर काही वेळाने येथील डॉ. नितीन दोशी यांच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर आणून रुग्णाला लावण्यात आला. आणि रुग्णवाहिकेतून या रुग्णाला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णासोबत डॉ. उमाकांत जाधव उपस्थित होते. या दरम्यानच्या काळात रुग्णाचे नातेवाईक व नागरिक पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात जमा झाले होते. कोविड काळात अनेक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर, औषधे व इतर साधनसामग्री दिली होती. मात्र या सर्व साधनसामग्रीचा योग्य प्रकारे वापर व देखभाल होत नसल्याचे बोलून उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे येथे काहीकाळ तणाव देखील निर्माण झाला होता. यावेळी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे व इतर पोलीस उपस्थित होते.

या घटनेची दखल घेतली असून, पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत.रिकामे ऑक्सिजन सिलेंडर तात्काळ भरून रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येतील. पुन्हा अशी घटना घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

शशिकांत मढवी, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी


Exit mobile version