चाकरमान्यांची ओढ गावाकडे; वृद्ध आई-वडील डोळ्यांत अश्रू
| कापोली | प्रतिनिधी |
एरवी घरात आम्हा दोघांशिवाय असतं तरी कोण? मुले रोजगारासाठी शहरात गेल्यावर ही रिकामी घरं खायला उठतात… कोकणातील एका वृद्ध मातेने व्यक्त केलेली ही खंत आज संपूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरांचे जळजळीत वास्तव आहे. एरवी वर्षभर गावात केवळ वयोवृद्ध लोकच तुरळक दिसतात. मात्र, लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस उरले असल्याने, आतापासूनच प्रत्येक वृद्ध आई-वडिलांचे डोळे लेकरांच्या आणि नातवंडांच्या वाटेकडे लागले आहेत. पोरांना वर्षातून एकदा का होईना घराची ओढ लावणाऱ्या बाप्पाचे आभार मानताना आज प्रत्येक पालकाचे डोळे पाणावले आहेत.
या सणाच्यानिमित्ताने एक गोष्ट मात्र, प्रकर्षाने जाणवते की, गणपती बाप्पा घरात जरी आले, तरी आपले खरेखुरे दैवत म्हणजेच आपले आई-वडील घरात असल्याशिवाय कोणताच सण-उत्सव पूर्ण होऊ शकत नाही. आई-वडील घरात असतील, तर मुलांवरील जबाबदारीचा भार हलका होतो, कारण त्यांच्या अनुभवाची आणि मायेची सावली पाठीशी असते. याउलट, ते जर घरात नसतील, तर घराला घरपण लाभत नाही आणि सणाचा सगळा उत्साह फिका पडतो.
रोजगाराच्या निमित्ताने तरुण पिढी शहरात गेल्यामुळे ओस पडलेली ही खेडी आता गणपती बाप्पाचे विसर्जन होईपर्यंत तरी माणसांनी आणि आनंदाने पूर्णपणे फुलणार आहेत. गावातील या सणाचा आनंद तो वेगळाच असतो, एक प्रकारे ते ‘स्वर्गसुखच’ असते. शहरात कितीही सुबत्ता असली, तरी गावाकडच्या मातीतील मायेचा ओलावा जरासुद्धा कमी होत नाही.
याच उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील वृद्ध पालकांनी शासनाला एक आर्त साद घातली आहे आणि बाप्पाच्या चरणी साकडे घातले आहे. सरकारने गावागावांत रोजगार आणि धंदे उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून आमची तरुण मुलं नोकरीसाठी शहरात जाणार नाहीत आणि ही गावं देखील कधी ओस पडणार नाहीत, अशी भावनिक मागणी पालकांकडून होत आहे.
वृद्ध आई-वडील म्हणतात, लेकरं डोळ्यांसमोर राहिली, तर आमची ही रोजची मरणयातना थांबेल. मुले शहरात असतात, त्यामुळे आमचे संपूर्ण लक्ष त्यांच्या काळजीकडे लागलेले असते. मुलं दूर असल्याच्या याच विवंचनेत आणि मानसिक तणावात आम्ही वारंवार आजारी पडतो. त्यामुळे गावातच उदरनिर्वाहाची साधने मिळाली, तर कुटुंब कधीच विभक्त होणार नाहीत, हा संदेश या निमित्ताने समोर आला आहे.
कोकणातील गणेशोत्सवाची खरी रंगत म्हणजे तिथली संस्कृती. बाप्पाच्या समोर ते उत्साहाने नाचणे, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर रात्र-रात्र जागवून भजन गाणे, आणि पारंपरिक जाखडी-नमन नृत्यात रमून जाणे, ही गावाची एक वेगळीच मजा असते. या आनंदाच्या भरात चाकरमान्यांच्या सुटीचे दिवस कधी संपतात तेही कळत नाही. बाप्पाच्या आगमनामुळे रायगडच्या वेशीपासून ते थेट सिंधुदुर्गच्या टोकापर्यंतची नाती पुन्हा एकदा गावाकडच्या मातीशी घट्ट जोडली जात असून, अवघा कोकण प्रांत आता या महाउत्सवाच्या रंगात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाला आहे. शासनाने या वृद्ध पालकांच्या आर्त हाकेकडे लक्ष देऊन ग्रामीण भागात रोजगाराचीनिर्मिती करावी, हीच आता वृद्ध आई-वडीलांचे बाप्पाला साकडे आहे.
घरांची रंगरंगोटी जोरात
बाप्पाच्या स्वागतासाठी सध्या कोकणातील गावागावांत घरांना रंगरंगोटी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्षभर बंद असलेली कुलुपे उघडून चाकरमानी घर चकचकीत करण्यात व्यस्त आहेत. बाजारपेठांमध्ये इतर दुकानात हवी तशी गर्दी अद्याप नसली, तरी रंगांचे डब्बे घेण्यासाठी दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या मोसमात रंग विकणारे दुकानदार मात्र सध्या भलतेच तेजीत आहेत.
