वनविभागासह नगरपरिषदेचे दुर्लक्ष; हॉटेल व्यावसायिक अडचणीत
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरती नगरपरिषद रस्त्याच्या कडेला, त्याचप्रमाणे वनखात्याच्या जागेवरती खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सधारकांचा विळखा पडला आहे. या प्रकारामुळे श्रीवर्धन शहरातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
श्रीवर्धन तालुक्यामध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. सध्या कोकणातील श्रीवर्धन हे पर्यटकांच्या पसंतीचे क्रमांक एकचे ठिकाण बनलेले आहे. शनिवारी व रविवारी श्रीवर्धन तालुक्यामध्ये असंख्य पर्यटक समुद्रकिनारा पाहण्यासाठी व या ठिकाणी असणार्या निसर्गरम्य निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र, नगरपरिषदेच्या मालकीच्या रस्त्याच्या कडेला अनेक स्टॉलधारकांनी अतिक्रमण केले असून, या स्टॉलधारकांमुळे अनेक वेळा समुद्रकिनारी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. श्रीवर्धन समुद्रकिनारी वनखात्याचीसुद्धा जागा असून, या जागेवरतीदेखील अनधिकृत स्टॉलधारकांनी आपला कब्जा केला आहे. विशेष करून वनविभागाच्या जागेतून समुद्रकिनार्याकडे जाणार्या रस्त्यावर अनेक स्टॉलधारकांनी जागा अडवून स्टॉल उभे केले आहेत. स्टॉल उभे करण्यासाठी जुन्या साड्यांचा वापर केल्यामुळे समुद्रकिनारा विद्रुप दिसत आहे. शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला काही स्टॉलधारक हे अत्यंत जुने असून, ते अनेक वर्षे धूप प्रतिबंधक बंधार्याजवळ आपला व्यवसाय करत आहेत. तसेच, फेस्टिवल बीचच्या बाजूलादेखील काही जुने स्टॉलधारक आपला धंदा करत आहेत. परंतु, दिवसेंदिवस रस्त्यावर अतिक्रमण करून पदार्थांचे स्टॉल टाकण्याचा मानस अनेक स्टॉलधारकांकडून दिसून येत आहे.
या सर्व प्रकारामुळे श्रीवर्धन शहरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले आहेत. तरी श्रीवर्धन नगरपरिषदेने व वनविभागाने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरचे अनधिकृत स्टॉल तातडीने हलवावेत, अशी मागणी श्रीवर्धनमधील सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.