कळंबोली परिसरातील अतिक्रमण उद्ध्वस्त

पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची धडक कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांचा फायदा उचलत कळंबोली परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केले आहे. सोमवारी (दि.19) करण्यात आलेल्या या कारवाईप्रसंगी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांसोबत जेसीबी यंत्र आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.

पनवेल पालिका हद्दीत असणार्‍या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या उभारण्याचे काम अनेक ठिकाणी करण्यात आलेले आहे. सण-उत्सव काळात लागोपाठ येणार्‍या सुट्ट्यांचा फायदा उचलत अतिक्रमण करण्याचे काम अनेकदा करण्यात येत असते. पालिकेत समाविष्ट सिडको वसाहतीत असलेल्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करण्याचे प्रमाण जास्त आहे. सिडकोकडून करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमण करून बांधण्यात येणार्‍या झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त गणेश देशमुख दिले आहेत. आयुक्त देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार सोमवारी उपयुक्त कैलास गावडे, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत कळंबोली वसाहतीमधील सिंग सिटी रुग्णालय ते रोडपाली तलाव या परिसरात करण्यात आलेली अतिक्रमण हटवली असून, अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात पालिकेमार्फत सुरु करण्यात आलेली कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती प्रभाग अधिकरी कवठे यांनी दिली आहे.

Exit mobile version