। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरासह परिसरातील अनेक मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यापासून फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले असून या अतिक्रमणाकडे नवनिर्वाचित आयुक्त मंगेश चितळे यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी सर्वसामान्य पनवेलकरांची मागणी आहे.
पनवेल शहरातील मार्केड यार्ड परिसर, भाजीमार्केट, मोहल्ला परिसर, लाईन आळी, रोज बाजार, उरण नाका परिसर याच्यासह बहुतांश परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व्यावसायिकांनी घुसखोरी करून त्यांच्या हातगाड्या तसेच, काही खाजगी जागेवर व्यवसाय सुरू केले आहेत. अशाच प्रकारे कामोठे, कळंबोली, खारघर, खांदा वसाहत, नवीन पनवेल येथील सिडकोच्या राखीव भूखंडावर मासळी, मटण, चिकन तसेच फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करुन व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. सिडको आणि पनवेल महापालिकाद्वारे कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्यामुळे फेरीवाल्यांनी थेट रस्त्यावर अतिक्रमण करुन व्यवसाय थाटला आहे. रस्ते आणि पदपथावर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण करुन व्यवसाय थाटल्याने परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार करुनही कोणत्याही प्रकारची कारवाई अनधिकृत फेरीवाल्यांवर केली जात नसल्यामुळे नागरिकांद्वारे संताप व्यक्त केला जात आहे.