जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे लागले लक्ष
। रायगड । आविष्कार देसाई ।
देशामध्ये विविध धार्मिक स्थळांच्या मालकी हक्कावरुन चांगलाच गदारोळ सुरु असतानाच आता रायगड जिल्ह्यातील सरकारी जमिनींवर विविध धर्मांच्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात 15 तालुक्यांतील सात तालुक्यांमध्ये 54 धार्मिक स्थळांनी 1.81.28 (हे.आर/चौ.मी.) जागेवर सरकारी आणि गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे. भक्तांच्या हट्टापाई देवांनाही अतिक्रमण करावे लागल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासन यावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
देशात संविधान हे सर्वोच्च असून, धर्म हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असल्याचे विविध माध्यमांतून वेळोवेळी अधोरेखित करण्यात आले आहे. संविधानाने प्रत्येक धर्माच्या नागरिकांना पूजाविधी करण्याची अनुमती दिली आहे. कोणी आपापल्या घरांमध्ये आराधना करतात, तर कोणी मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च, बौद्धविहार अशा ठिकाणी देवाचे स्मरण करतात. गावागावांमध्ये आस्थेची जपवणूक करण्यासाठी श्रद्धेने विविध धार्मिक स्थळांची निर्मिती करण्यात येते. मात्र, रायगड जिल्ह्यात 15 तालुक्यांतील सात तालुक्यांमध्ये 54 धार्मिक स्थळांनी सरकारी आणि गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 46 मंदिरं, सहा बौद्ध विहार आणि दोन दर्ग्यांचा समावेश आहे. त्या माध्यमातून तब्बल 1.81.28 (हे.आर/चौ.मी.) जागेवर अतिक्रण झाल्याचे उपलब्ध सरकारी कागदपत्रांवरुन दिसून येते.
अलिबाग तालुक्यातील 13 गावांमध्ये 12 मंदिरे आणि एक बौद्धविहार सरकारी जागेत उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यात सहा गावांमध्ये 10 मंदिरे, मुरुडमधील दोन गावात दोन मंदिरे, पेणमधील चार गावांत चार मंदिरे, महाडमधील दोन गावात दोन मंदिरे आणि एक दर्गा, खालापूरमध्ये 16 गावांमध्ये 14 मंदिरे, दोन बौद्धविहार, प्रत्येकी एक सेवालाल महाराज आणि दर्ग्याचा समावेश आहे. तसेच, माणगाव, म्हसळा, उरण, सुधागड, श्रीवर्धन, कर्जत, तळा आणि पोलादपूर या आठ तालुक्यांमध्ये एकाही धार्मिक स्थळाचे सरकारी अथवा गायरान जमिनीवर अतिक्रमण झालेले नाही. त्यामुळे येथील गावकरी याबाबतीमध्ये सजग असल्याचे दिसून येते.
देशात संविधान हे सर्वोच्च आहे. आस्था असावी, मात्र कोणत्याही धार्मिक स्थळांचे अवडंबर माजवून धार्मिक तेढ निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे. काही राजकारणी याच गोष्टींचा फायदा घेतात. धर्माचा विषय आला की, नागरिक बोटचेपी भूमिका घेतात. यासाठी नागरिकांनी जागरुक असले पाहिजे. संविधानाच्या मूल्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न असतो. एखाद्या गरिबाने झोपडी बांधली तर ती तातडीने जमीनदोस्त करण्यात येते. मोठ्या संख्येने धार्मिक स्थळांचे अतिक्रण गंभीर बाब आहे.
नितीनकुमार राऊत, जिल्हाध्यक्ष, अंनिस
जिल्हा प्रशासनाने यासंबंधीची माहिती गोळा केली आहे. अतिक्रणाबाबत नोटीसा काढल्या आहेत. आधी औद्योगिक, निवासी आणि नंतर धार्मिक स्थळांबाबत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
सचिन शेजाळ, तत्कालीन तहसीलदार, रायगड







