बाजाराने रस्त्याची कोंडी; नगरपरिषदेकडे कारवाईची मागणी
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन बाजारपेठेत अनेक मच्छी विक्रेत्या महिला मच्छी विक्री करण्यासाठी रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेचे मच्छी मार्केट उपलब्ध आहे. या मार्केटची दुरुस्ती नगरपरिषेकडून नुकतीच करण्यात आली. त्या ठिकाणाचे काँक्रिटीकरण नवीन करण्यात आले. परंतु, मच्छी विक्री करणाऱ्या महिलांचा गैरसमज आहे की, रस्त्यावर बसल्यानंतर जास्त मच्छी विकली जाते. त्यामुळे त्यांना मार्केट असूनसुद्धा रस्त्यावर बसण्यात स्वारस्य असल्याचे पाहायला मिळत आहे.
मच्छी विक्रेत्या महिला रस्त्यावर बसत असल्यामुळे मच्छी खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक आपल्या दुचाकी रस्त्यावर पार्क करतात. तसेच त्या ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड असूनदेखील रिक्षा लावण्यासाठी रिक्षा चालकांना जागा नसल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात येते. विक्रीसाठी बसणाऱ्या महिला ज्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणाहून चिकन मार्केट व मटण मार्केटकडे जाणारा रस्ता आहे. त्याचप्रमाणे एक हॉटेल व काही दुकानेदेखील त्या ठिकाणी आहेत. मच्छी विक्रेत्या महिला सदर रस्त्यावर बसत असल्यामुळे दुकानांमध्ये व चिकन, मटण मार्केटमध्ये जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मच्छी विक्रेत्या महिला रस्त्यावर बसत असल्याने त्या ठिकाणी मच्छीचे पाणी पडून खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधीदेखील पसरलेली पाहायला मिळते. मच्छी विक्रेत्या महिला रस्त्यावर बसत असल्यामुळे मच्छी घेऊन येणारे टेम्पो व रिक्षादेखील रस्त्यावर उभे राहतात व खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. श्रीवर्धन बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. परंतु, महिला रस्त्यावर बसत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे दिसत आहे. तरी श्रीवर्धन नगर परिषदेने रस्त्यावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्या महिलांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी मच्छी विक्रेत्या महिला नगरपरिषद कार्यालयात आल्या होत्या व त्यांनी मच्छी मार्केट दुरुस्त करण्याबाबत नगरपरिषेककडे विनंती केली होती. त्यानुसार नगर परिषदेने मच्छी मार्केटची दुरुस्ती करून त्या ठिकाणी नवीन पीसीसी करून दिलेले आहे. मच्छी विक्रेत्या महिला रस्त्यावर बसत असतील तर त्यांच्यावरती नगरपरिषदेकडून कारवाई केली जाईल.
विराज लबडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक, श्रीवर्धन नगरपरिषद
