वनविभागाकडून सपशेल दुर्लक्ष
। रसायनी । प्रतिनिधी ।
मोहोपाडा बारवई या रस्त्यावर ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा हद्दीतील मोहोपाडा वाडी, खोंडावाडी, पानशिल, तळेगाव, तळेगाववाडी, तळेगाव आदिवासीवाडी आदी गावे व वाड्या येत असून, या परिसरातील तसेच आसपासच्या भागातील नागरिकांची ये-जा, वाहनांची वर्दळ सुरु असते. परंतु, या रस्त्यावरील बारवई पुलाजवळ वनविभागाच्या जागेत खुलेआम अतिक्रमण सुरु असून, खुलेआम शेड उभारुन पैसे कमाविण्याचा धंदा तेजीत असल्याचे दिसून येते.
वनविभागाच्या जागेत खुलेआम अतिक्रमण होत असतानाही अधिकारी बघ्याची भूमिका बजावत आहेत. याच जागेवर दरवर्षी होणार्या वारकरी सांप्रदायाच्या सप्ताह कार्यक्रमाला यावर्षी वनविभागाने परवानगी दिली नाही, मात्र बांधकामांना परवानगी कशी मिळते, अशी चर्चा नागरिकांत सुरु आहे.
दरम्यान, मोहोपाडा-तळेगाव-बारवई पूल रस्त्यावरुन पनवेलकडे जाताना वेळ वाचत असल्याने नागरिकांची रहदारी, वर्दळ सुरु असते. याच रस्त्यावरुन शाळकरी विद्यार्थी, कामगारवर्ग प्रवास करतो. परंतु, बारवई पुलाजवळील वनविभागाच्या जागेवर खुलेआम शेड उभारण्याचे काम सुरु असून, कोणतीही वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने तेरी भी चुप, मेरी भी चुप असाच प्रकार असल्याची चर्चा नागरीकांत सुरु आहे.