तक्रारी करूनही तहसीलदारांकडून कारवाईस टाळाटाळ; सामाजिक कार्यकर्ते संजय घरत यांचा आरोप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सरकारी गायरान जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार, ग्रामसेवक यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून तक्रार करीत आहे. मात्र, त्यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय घरत यांनी केला आहे. महसूल विभाग याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आठ दिवसांत योग्य ती कार्यवाही केली नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा घरत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
वरसोली ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या संजीवनी कवळे यांचे पती संजय कवळे यांनी वरसोली ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 237/1/अ/1 या सरकारी गायरान (गुरचरण) जागेमध्ये अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या बांधकाम केले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणतीही परवानगी न घेता घर क्रमांक 2037 अ ते 2037 फ या घरांचे अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. ही घरे सरकारी गुरचरण सर्वे नं.237/1/अ/1 या प्रस्तावित गावठाणे विस्तार अंतर्गत ग्रामपंचायत जागेत असल्याची खोटी माहिती देण्यात आली आहे. गुरचरण जागा बळकावून स्वतःचे आर्थिक हित साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही बाब ग्रामपंचायतीसह तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांनी अजूनपर्यंत कारवाई केली नाही. फक्त कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, तसेच संजय कवळे यांचे बेकायदेशीर बांधकामदेखील तोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येत आहे.







