मोरटाका आदिवासीवाडीतील जमिनींवर अतिक्रमण

। रसायनी । प्रतिनिधी ।
कल्हे हद्दीत मोरटाका आदिवासीवाडीत गेली कित्येक वर्षे सर्व्हे 176/7 जागी आदिवासी समाज राहत आहे. या जागेत आंबा, काजू, केळी वगैरे फळझाडे लावली आहेत. पावसाळी भाजीपाला लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु धनाढ्यांची या जागेवर नजर असून पैशाच्या जोरावर गोरगरीब आदिवासी बांधवांना हटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मोरटाका आदिवासी ग्रामस्थ गणपत लहू पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

मोरटाका येथील सर्वे नं.176/5 व 176/7 या जमिनीतून जंगलाकडे जाणारा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता तसेच स्थानिक आदिवासी बांधवांचा ये-जा करण्याचा रस्ता आहे. हा रस्ता खुला ठेवण्याचा उल्लेखही सातबार्‍यात आहे. परंतु धनाढ्य लोक गोरगरीब आदीवासींवर अन्याय करुन दमदाटी करत रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील ग्रामस्थ गणपत पवार यांनी सांगितले. दरम्यान मोरटाका असेसमेंटधारक गणपत पवार, गोकुळ नाईक, दत्ता वाघमारे, बबन पवार यांनी न्याय न मिळाल्यास कष्टकरी मुक्ती संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version