अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
| महाड | प्रतिनिधी |
महाड औद्योगिक वसाहतीमधील सर्व्हिस रोडवर अनधिकृत गॅरेज आणि अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यालगत असलेल्या गटारांवरच जेसीबी, डंपर आणि अन्य अवजड वाहने उभी केली जात असल्याने सर्व्हिस रोडची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील वाहनांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्हावी, यासाठी निर्माण करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचा सध्या अनधिकृत गॅरेजधारकांकडून खासगी वापर होत असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कडेला गॅरेज, थाटून अवजड वाहनांची दुरुस्ती, पार्किंग तसेच साहित्य ठेवले जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होत आहे. परिणामी, वाहनांची वर्दळ वाढताच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तर दुसरीकडे गाळेधारकांच्या दुकाना समोर अनाधिकृत टपरीधारकांनी बस्तान वाढवण्याचे चित्र दिसू लागले आहे.
विशेष म्हणजे, गटारांवर अवजड वाहनांची पार्किंग केली जात असल्याने गटारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रकाराची महाड एमआयडीसी प्रशासन, संबंधित ग्रामपंचायत आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने दखल घेऊन सर्व्हिस रोडवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत, तसेच बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी आहे की अनधिकृत गॅरेज आणि अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
