फेरीवाल्यांनी मांडले बस्तान
| नेरुळ | प्रतिनिधी |
सिडकोतर्फे सामाजिक सुविधांसाठी नवी मुंबई शहरांमध्ये अनेक भूखंड आरक्षित ठेवले आहेत. मात्र, सिडकोने आरक्षित ठेवलेले भूखंड सुरक्षित ठेवण्यात नवी मुंबई महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. सिडकोने आरक्षित ठेवलेल्या बहुतांश भूखंडांवर अवैध इमारती बांधण्यात आल्या असून, काही भूखंडावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे चित्र घणसोलीमध्ये दिसत आहे.
महापालिकेने आरक्षित ठेवलेल्या अनेक भूखंडांवर सध्या फेरीवाल्यांनी डोळा ठेवला आहे. घणसोली सेक्टर सातमधील भूखंडावर भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या भूखंडावर संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या आणि गेट गंजल्याने काढून टाकण्यात आले आहे. त्यातच या ठिकाणी रस्त्यावर बसणार्या भाजीविक्रेत्यांनी घणसोली सेक्टर सातमधील मैदानावरही अतिक्रमण केले आहे. या मैदानात गेट तोडून भाजीविक्रेत्यांनी शिरकाव केला आहे. भाजीविक्रेते, कांदा-बटाटा विक्रेत्यांनी मागील काही महिन्यांपासून येथे विनापरवाना व्यवसाय सुरू केला आहे. महापालिकेने आरक्षित केलेल्या भूखंडावर अतिक्रमण करून भूखंड गिळंकृत करण्याचा डाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली सेक्टर सातमधील भूखंडावर अतिक्रमण केल्याबाबत पाहणी करण्यात येईल. अतिक्रमण पथकाकडून या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. घणसोली विभागात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणार्यांवर तसेच पदपथावर बस्तान मांडणार्यांवर, बेकायदा फेरीवाले, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल.
संजय तायडे,
घणसोली विभाग अधिकारी, महापालिका







