। पाताळगंगा । वार्ताहर ।
सध्या जागेला सोन्याचे भाव निर्माण झाल्यामुळे धनिकांनी जमिनी मिळणे अशक्य होत असून, आपला मोर्चा दुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधव यांच्याजवळ असलेल्या गावठाणकडे वळविण्यात आला आहे. पौंध, माजगाव आदिवासी वाडीतील शेकडो बांधव या ठिकाणी अनेक वर्षे येथे राहात आहेत. मात्र, धनिकांच्या माध्यमातून सातत्याने त्यांना नाहक त्रास देण्यात येत असल्यामुळे माजगाव सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या माध्यमातून मंगळवारी नायब तहसीलदार कल्याणी कदम (मोहिते) यांना निवेदन देण्यात आले.
सरपंच गोपीनाथ जाधव यांच्याकडे अदिवासी बांधव यांनी समस्यांचा पाढा वाचला. दुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधव अशिक्षित असून यांच्या जवळ गावठाण आणी हक्काची जागा असून त्यांना फसवून जागा हस्तगत केली जात आहे. खासगी मालकांकडून सर्रासपणे येथील बांधवांना नाहक त्रास देण्याचे काम सुरु आहे. ही जागा आमची आहे असे सांगून तारेचे कुंपण घालण्यासाठी गुंड प्रवृत्ती दाखवीत असताना, येथील बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सरपंच गोपीनाथ जाधव, माजी उपसरपंच नितीन महाब्दि, राजेश महाब्दी, सदस्या कल्पना वाघे आदी शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थित नायब तहसीलदारांकडे निवेदन सादर केले.