प्रशासनाचे मौन, नागरिक त्रस्त
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणाचा सर्वात मोठा फटका रस्त्यांना बसत असून, पादचाऱ्यांचे हाल दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ऐतिहासिक शहर असलेल्या पेणचे बहुतांश रस्ते अरुंद असताना, त्यावर बिनधास्तपणे फळ विक्रेते, भाजी विक्रेते, खेळणी व कपडे विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा बस्तान मांडून बसले आहेत. परिणामी, रस्ता पूर्णपणे व्यापला जात असून, पादचाऱ्यांसाठी चालायला जागाच उरलेली नाही.
पेण शहरातील अंतोरा रस्ता याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजी व फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्यावरुन सार्वजनिक विद्यामंदिर, कोएसो लिटल एंजल स्कूल, गुरुकुल या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. लहान मुलांना दररोज जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना अक्षरशः रस्त्यावरुन चालणे अशक्य झाले आहे. फूटपाथवर विक्रेत्यांचे अतिक्रमण असल्याने पादचाऱ्यांना थेट वाहनांच्या मध्ये उतरुन चालावे लागत आहे. अपघात झाला तर जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरपालिका प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. लोकांच्या सुरक्षेची कोणाला चिंता नसून, ठेकेदार मात्र रोजच्या रोज आपली वसुली करण्यात मग्न आहेत. जितके विक्रेते रस्त्यावर बसतील, तितका ठेकेदारांचा आणि संबंधितांचा धंदा जोमात, त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
पादचाऱ्यांचा हक्क असलेला पदपथ विक्रेत्यांनी बळकावल्याने ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतत्प सवाल आता नागरिक विचारु लागले आहेत. तरी नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारताच या गंभीर प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
