इंग्लंडची प्रतिष्ठा पणास

| जर्मनी | वृत्तसंस्था |

युरो करंडक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या गतउपविजेत्या इंग्लंडची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे. आठ संघांच्या फेरीत त्यांना फॉर्ममध्ये असलेल्या धोकादायक स्वित्झर्लंडच्या कडव्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. मागील लढतीत गतविजेत्या इटलीला 2-0 फरकाने पराभूत करताना मुराट याकिन यांच्या मार्गदर्शनाखालील स्विस संघाने उल्लेखनीय चमक दाखविली होती. राऊंड ऑफ 16 फेरीत इंग्लंडचा संघ पराभवाच्या खाईत असताना स्लोव्हाकियाविरुद्ध भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटासला ज्युड बेलिंगहॅम याने बरोबरीचा गोल केला आणि नंतर अतिरिक्त वेळेतील पहिल्याच मिनिटाला कर्णधार हॅरी केन याने केलेल्या गोलमुळे इंग्लंडने 2-1 विजयासह आगेकूच राखली.

जर्मनीत सुरू असलेल्या युरो करंडकात इंग्लंडला अपेक्षेनुसार कामगिरी बजावता आलेली नाही, त्यामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक साऊथगेट यांच्यावर टीकाही झाली आहे. दुसरीकडे स्वित्झर्लंडने स्पर्धेत सातत्य राखलेले आहे. अ गटातील अखेरच्या लढतीत भरपाई वेळेतील गोलमुळे जर्मनीने त्यांना बरोबरीत रोखले होते. त्यामुळे स्विस संघाचे गटविजेतेपद हुकले. नियमित बचावपटू मार्क गेही निलंबनामुळे खेळू शकणार नाही, त्यामुळे इंग्लंडची बचावफळी कमजोर संभवते. शिवाय जॉन स्टोन्सने पायावरील बँडेजसह सराव केला, तर दुखापतीनंतर यावर्षी फेब्रुवारीनंतर ल्युक शॉ खेळलेला नाही, त्यामुळे इंग्लंडची बचावफळी दडपणाखाली आहे. स्वित्झर्लंडचा अनुभवी मध्यरक्षक ग्रानिट झाका याने मध्यफळीत शानदार कामगिरी प्रदर्शित केलेली आहे.

Exit mobile version