। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकात ‘सुपर-8’ चे समीकरण आता रंजक होताना दिसत आहे. विश्वचषकाचा 20 वा सामना स्कॉटलंड आणि ओमान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्कॉटलंडने शानदार विजयाची नोंद केली. ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 7 गडी गमावून 150 धावा केल्या. पाठलाग करताना स्कॉटलंडने केवळ 13.1 षटकांत ही धावसंख्या गाठली. या पराभवानंतर ओमानही स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तसेच, स्कॉटलंडच्या या विजयानंतर इंग्लंडचा संघ ही जवळपास बाहेर गेला आहे.
‘ब’ गटातील ओमानविरुद्धच्या विजयानंतर स्कॉटलंडचे 3 सामन्यांत 5 गुण झाले असून त्यांचा नेट रन रेटही चांगला आहे. अशा प्रकारे संघ ‘ब’ गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर, ऑस्ट्रेलिया 2 सामन्यात 2 विजयांसह 4 गुणांसह दुसर्या स्थानावर घसरला आहे. त्याचवेळी नामिबिया 2 सामन्यांनंतर 2 गुणांसह तिसर्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ 2 सामन्यांत 1 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. जोस बटलरच्या संघाचा सुपर 8 मध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण दिसत आहे, कारण त्याला आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील आणि इतर संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.