| आगरदांडा | प्रतिनिधी |
जिंदल विद्या मंदिर, साळाव येथे इंग्रजी भाषादिन मोठ्या उत्साहात आणि सर्जनशीलतेच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. नर्सरी ते इयत्ता 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमधून सक्रिय सहभाग नोंदवत इंग्रजी भाषेवरील आपले प्रेम व्यक्त केले.
या दिवशीचा संबंध थेट महान नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म व मृत्यू दिनाशी असल्याने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करणारे भाषण झाले. संपूर्ण शाळा परिसर साजशृंगाराने सजला होता आणि विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांची उत्तम झलक पाहायला मिळाली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले रस्किन बाँड यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा, जिच्यात विद्यार्थ्यांनी या प्रसिद्ध लेखकाविषयीचे आपले ज्ञान दाखवले. त्यानंतर सादर झालेला ग्रॅमर डान्स म्हणजेच व्याकरण व नृत्य यांचा सुंदर संगम उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारा ठरला.
नर्सरी, एल.के.जी. व यू.के.जी.मधील चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचे मन जिंकले. तर मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध इंग्रजी साहित्यकृतींवर आधारित गीत, नृत्य व अभिनय सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचा समारोप विल्यम शेक्सपिअर यांना अर्पण करण्यात आलेल्या श्रद्धांजलीने झाला.प्राचार्य मुकेश ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमधून इंग्रजी भाषेचे सौंदर्य आणि साहित्याची गोडी अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. तर, उपप्राचार्य मंगेश बमनोटे यांनीही विद्यार्थ्यांचे उत्साहाने केलेल्या सादरीकरणाचे विशेष कौतुक करत, इंग्रजी साहित्याशी विद्यार्थ्यांचे नाते अधिक दृढ व्हावे, असे मार्गदर्शन केले.