| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पूर्वी शहरी भागात कार प्रशिक्षण केंद्र होते. शहराच्या ठिकाणी प्रशिक्षणाला येताना प्रशिक्षणार्थींना अडथळे येत होते. मात्र आता ग्रामीण भागात कार चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरु झाल्याने प्रशिक्षणार्थींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. अलिबाग तालुक्यातील वावे परिसरात श्री समर्थ कृपा मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या माध्यमातून 600हून अधिक प्रशिक्षणांनी धडे घेतले आहेत.
तालुक्यातील मल्याण येथील रहिवासी असलेले दिलीप बाळाराम कंटक यांनी वावे परिसरात श्री समर्थ कृपा ड्रायव्हींग स्कूल सुरू केले आहे. 2020पासून सुरु झालेल्या या ड्रायव्हींग स्कूलच्या माध्यमातून आतापर्यंत 604 जणांना कार चालविण्याचे शिक्षण घेतले आहे. ग्रामीण भागात ड्रायव्हींग स्कूल सूरू झाल्याने अनेकांना प्रत्यक्ष कार चालविण्याचे धडे मिळत आहेत. यातून योग्य कार चालविण्याचे धडे देत असताना वाहतूकीच्या नियमांची माहितीदेखील देण्याचे काम कंटक यांच्याकडून केले जाते. वाहन चालवित असताना वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे, याची जाणीवदेखील ते त्यांच्या प्रशिक्षणार्थींना वेळोवेळी देत असतात. आतापर्यंत एक हजारहून अधिक जणांनी वाहन चालविण्याचे परवाने काढले आहेत.
सुरुवातीला एसटीमध्ये सेवा त्यानंतर काही मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणून चालक प्रशिक्षक अशी सुरुवात केली. वीस वर्षाचा अनुभव घेऊन स्वतः व्यवसायात उतरून वावेसारख्या ग्रामीण भागामधील मुलांना किंवा ज्यांना वाहन चालविण्यासाठी शिकण्याची इच्छा आहे अशा अनेकांना त्यांनी प्रशिक्षण देऊन उत्तम चालक बनविण्याचा प्रयत्न केला आहे. वाहन चालविण्याचे धडे घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांचादेखील सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. अलिबाग तालुक्यातील वावे, बामणगाव, रामराज, सुडकोली, रेवदंडा, चौल, नागाव तसेच मुरुड तालुक्यातील साळाव, मिठेखार, चोरढे, कोर्लई, बोर्ली, काशीद या परिसरातील मंडळींकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.







