कोकणातल्या उद्योजकांनी आत्मपरीक्षण करावे-सुभाष देसाई

। चिपळूण । वार्ताहर ।
लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र परिसरात बसविण्यात आलेल्या हवा प्रदूषण निरीक्षण प्रदर्शन यंत्रणेचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मनोगत व्यक्त करताना, लोटे येथे हवा प्रदूषण निरीक्षण व प्रदर्शन यंत्रणा बसवणे म्हणजे उद्योजकांनी स्वतःच्या कामाचे परीक्षण करण्यासारखेच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या मनोगतात उद्योगमंत्री सुभाष देसाई पुढे म्हणाले की, लोटेतील उद्योजकांनी उचललेले हे पाऊल धाडसाचे असून, ते निश्‍चितच कौतुकास्पद आहे. ही यंत्रणा मुंबई येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आलेली असल्यामुळे रीडिंग मध्ये कोणतेही गैर आढळल्यास संबंधितांना जाब विचारला जाईल व संबंधितांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.हा चांगला उपक्रम राबविला असून अशा प्रकारची यंत्रणा राज्यामध्ये इतर सर्वत्र राबविण्याबाबतनिर्देश देण्यात येतील. तसेच जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने येथे कार्यान्वित करण्यात आलेली हवा प्रदूषण निरीक्षण प्रदर्शन यंत्रणा नक्कीच उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्‍वासही त्यांनी केला आहे.

या कार्यक्रमात संस्थेच्या माध्यमातून गोवळकोट – भोईवाडा येथे अतिवृष्टीने बाधित झालेल्यांना त्यांच्या हस्ते मदतही देण्यात आली. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, सीईटीपी चेअरमन सतीश वाघ, व्हाईस चेअरमन महादेव महिमान, अधीक्षक अभियंता वानखडे, लोटे सरपंच चंद्रकांत चाळके, घाणेखुंट सरपंच अंकुश काते, प्रशांत पटवर्धन आदी मान्यवर तथा स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version