| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर येथे सुरू असलेल्या पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नागरिकांचे ओळखपत्र तपासूनच प्रवेश दिला जात असल्याचे समोर आले आहे. या नव्या व्यवस्थेमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या रांगा लागत असून, प्रवेशाच्या नियमांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पनवेल आरटीओ कार्यालय काही महिन्यांपूर्वी खारघर येथे स्थलांतरित झाले. गेल्या काही दिवसांपासून कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांची ओळखपत्रे तपासली जात आहेत. यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित नागरिकाचे आरटीओ कार्यालयात कोणते काम आहे, याचीही चौकशी केली जात आहे.
शासकीय कार्यालयात प्रवेशासाठी ओळखपत्र तपासणीची ही व्यवस्था कोणत्या नियमांनुसार लागू करण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, कार्यालयातील कामकाज अधिक सुव्यवस्थित व्हावे आणि अनावश्यक गर्दी टाळता यावी, या उद्देशाने ही व्यवस्था सुरू करण्यात आली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आरटीओ कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवरून स्थानिक सोसायटी आणि आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. तसेच सप्टेंबरमध्ये विलास सनगर या एजंटला साडेचार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याची घटनाही घडली होती. पनवेलचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी सांगितले की, सध्या आरटीओ कार्यालयातील सुमारे 70 टक्के कामकाज ऑनलाइन झाले आहे. नागरिकांची कामे लवकर व्हावीत, यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचे कार्यालयात काम आहे, त्या व्यक्तीनेच कार्यालयात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओळखपत्र तपासणीच्या व्यवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच प्रवेशासंबंधीचे नियम स्पष्टपणे जाहीर करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आरटीओ कार्यालयात ओळखपत्र तपासणीनंतरच प्रवेश
