रायगडात लम्पीचा शिरकाव; कर्जत तालुक्यातील पाच गुरांचा रिपोर्ट पॉझिटिव

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेच्या सुचना

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अखेर लम्पीच्या साथीने रायगड जिल्ह्यात देखील शिरकाव केला आहे. कर्जत तालुक्यात आढळलेल्या 11 संशयीत गायीं पैकी पाच गायींना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. लम्पीचे रुग्ण सापडलेल्या ठिकाणच्या पाच किमी परीसरामध्ये पशु वैद्यकीय विभागाने चार हजार गोवंशांचे लसीकरण केले आहे. पुढील कालावधीत लम्पीचा धोका आणखीन वाढणार असल्याने शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पशूधन लम्पी रोगामुळे धोक्यात आले आहे. देशभरात 50 हजारहून अधिक बळी या रोगाने घेतले आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यामध्येही जिल्हा प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. परंतू पाच गायींना लम्पीची लागण झाल्याचे उघड झाल्याने रायगड जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एक लाख 76 हजार 906 गायी तर 62,225 म्हशी आहेत.

कर्जतमध्ये सापडलेली जनावरे पर जिल्ह्यातून आणण्यात आली होती. 11 पैकी पाच गायींना लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवालातून उघड झाले आहे. त्या ठिकणच्या पाच किमी परिसरामध्ये लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत तार हजार लसीकरण झाले आहे. अद्यापही दोन हजार 755 जनावरांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

पशू विभागातील तब्बल 34 अधिकारी, कर्मचारी हे लसीकरण करत आहेत. जिल्ह्यात अद्यापही सहा हजार लसी उपलब्ध आहेत. त्यामाध्यामातून या परिसरात लसीकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व जनावरांना लसीकरण करण्याबाबतची परवानगी सरकारकडे मागण्यात आली आहे. त्यांच्याकडून परवानगी प्राप्त झाल्यावर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. तसेच आवश्यक असलेल्या लसींचा साठा मागवण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल 15 गोशाळा आहेत. पैकी 12 या नोंदणीकृत आहेत. या ठिकाणी दोन हजार 418 गायी आहेत. त्यांचे लसीकरण लवकरच करण्यात येणार आहे. उनाड गायींचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करणे हे अवघड काम पशु वैद्यकीय विभागाला करावे लागणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे 100 आणि अन्य 22 ठिकाणी असणार्‍या दवाखान्यामध्ये असणारी रिक्त पदे भरण्याला मंजूरी मागण्यात आली आहे. ती मिळाल्यावर या ठिकाणी जनावरांवर उपचार करणे सोपे जाणार आहे.

Exit mobile version