विविध उपक्रमांतून पर्यावरण दिन साजरा

महाडमध्ये फ्रेंड्स ग्रुप तर्फे रोपांचे वाटप

| महाड | वृत्‍तसंस्था |

शहरांमध्ये जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला. शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात आली. फ्रेंड्स ग्रुप या संस्थेतर्फे कृषी महाविद्यालय, कोकरे येथील मोतीराम जगताप कृषी विद्यालय आणि महाड, वन विभागातर्फे वृक्ष वाटप करण्यात आले तर सोसायटी फेडरेशन आणि नगरपालिका यांच्यावतीने रोपांची लागवड करण्यात आली.

सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सहभागी असलेल्या महाड शहरातील प्रामुख्याने तरुणांच्या सहभाग असलेल्या फ्रेंड्स ग्रुपतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गेल्या काही वर्षापासून झाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाड तालुक्यामध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा हा उपक्रम फ्रेंड्स ग्रुपच्या तरुण कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदेश कळमकर यांनी दिली. महाड तालुक्यातील आचळोली येथील कृषी महाविद्यालय, मोतीराम जगताप कृषी विद्यालय, कोकरे आणि वनविभाग महाड यांचे या कार्यक्रमाला अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले आहे. काजू, आंबा, चिंच, फणस, कडुलिंब, गुलमोहर, करंज यासह अन्ये एक हजार पेक्षा अधिक रोपांचे वाटप शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित करण्यात आले होते.

महाड नगरपरिषद महाड व रायगड जिल्हा हाऊसिंग फेडरेशनमार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महाडमधील हाऊसिंग सोसायटीमध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आला. जवळपास दहा हाऊसिंग सोसायटीमध्ये महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, अधिकारी तसेच रायगड जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष राजाराम पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण बाळ, सचिव गंगाधर साळवी व प्रत्येक हौसिंग सोसायटीतील पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या वेळेला मुख्याधिकारी कोळेकर यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये वृक्षारोपण, संगोपनाचे महत्त्व सांगितले. प्रत्येक झाडाचे पालकत्व स्वीकारून किंवा प्रत्येक झाडाला आपल्या कुटुंबातील लहान मुलांचे नाव देऊन त्याचे संगोपन लहान मुलासारखे व्हावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडाचे संगोपन करणे ही प्रत्येक हाऊसिंग सोसायटीतील सदस्यांची जबाबदारी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version