| पाली | वार्ताहर |
निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या पाली तालुक्यात सध्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निसर्ग संपत्तीचा र्हास होताना दिसत आहे. याचा परिणाम मानवी जीवनावरही होताना होत आहे.
सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. कडा, डोंगर कपारीत वसलेल्या सुधागड वासीयांचे शेती हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. औद्योगिकीकरण तसेच कंपन्या नसल्याने येथील निसर्ग प्रदूषणापासून कायम अबाधित राहिला आहे. चहूबाजुंनी पर्वतरांगा, गड किल्ले यामुळे सौंदर्यात आणखी भर पडत आहे. त्यामुळे सुधागड तालुका हा ट्रेकर्सना व पर्यटनासाठी आकर्षण बनला आहे. सुधागड च्या निसर्गरम्य वातावरणाची पुणे, मुंबईसह इतर राज्यातील नागरिकांना भुरळ पडली आहे.
परंतु सध्याच्या घडीला या सौंदर्याला विकासकांची नजर लागल्याचे दिसते आहे. तालुक्यातील शेतकर्यांच्या जागा विकत घेऊन त्याठिकाणी बंगले, रिसॉर्ट बांधण्याचा विकासकांनी घाट घातला आहे. विकास होणे गरजेचे असताना मात्र एकीकडे निसर्गाचा र्हास होताना दिसत आहे.सपाटीकरणाच्या नावाखाली मोठं मोठे डोंगर, टेकड्या फोडले जात आहेत. झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन केले जात असून शासनाचा लाखोंचा महसूल बुडवला जात आहे. महसूल अधिकारी, तलाठी यांना हाताशी धरून काही जुजबी रक्कम रॉयल्टीच्या नावाखाली भरून शासनाची फसवणूक केली जात आहे. शेतघरांच्या नावाखाली आलिशान बंगले बांधले जात आहेत. याकडे शासनाचे लक्ष नाही का? शासनाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करीत असल्याचे सर्वसामान्यांचे दबक्या आवाजातील सूर उमटताना दिसत आहेत.
नावापुरती झुडुपे तोडण्याची व साफसफाई करण्याची परवानगी घेऊन संपूर्ण डोंगरच नेस्तनाबूत केला जात आहे. जागा साफ करण्यासाठी पेटवून दिले जात असल्याने वणवे लागून पाला पाचोळा, झुडुपांसोबत हिरवीगार झाडे जळून खाक होत आहेत. वनविभागाचे याकडे लक्ष नाही का? घनदाट, हिरवीगार दिसणारी झाडी मात्र विकासकांनी संपुष्टात आणून डोंगर, टेकड्यांचे टक्कल केल्याचे सगळीकडे बघायला मिळत आहे.