रासायनिक टँकरच्या साफसफाईचा पर्यावरणाला धोका

। उरण । वार्ताहर ।

जेएनपीए बंदर परिसरात अनेक ठिकाणी असलेल्या अनधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचे टँकर धुण्यात येत आहेत. मात्र, पर्यावरणाला हानीकारक असलेल्या या कृत्याकडे संबंधित अधिकारी वर्ग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमारांनी टँकर धुतल्यानंतर बाहेर फेकल्या जाणार्‍या रसायनमिश्रित पाण्यामुळे मासे मरत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

जेएनपीए कंटेनर फ्रेट स्टेशनजवळील सोनारी येथील अशाच एका सेवा केंद्रात दररोज किमान 10 टँकर स्वच्छ केले जातात, असे महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जेएनपीए परिसरात अशी अनेक टँकर सेवा केंद्रे आहेत जिथून घातक रसायनांचे टँकर धुतले जात असून त्या माध्यमातून घातक रसायने थेट खाडीत जात असल्याने मोठ्या प्रमाणात मासे मारले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच, रसायनांचे टँकर धुण्याचे प्रकार नियमित अंतराने घडत असून याचा परिसरातील जैवविविधतेवर परिणाम होतो, असे हितेश कोळी यांनी सांगितले. यामुळे यातील दोषींवर तत्काळ एफआयआर दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Exit mobile version